लेख – आभाळमाया – ‘शून्य’ सावलीचा दिवस!

>> वैश्विक 

एक हिंदी गाणं आहे. ‘इस दुनिया में कोई साथी है तो मेरा साया’ म्हणजे या जगात आता माझी कोणी सोबती असेल तर ती केवळ माझी सावली, असं निराश नायक म्हणतो; परंतु सावलीसुद्धा प्रकाश असेल तेव्हाच साथ देणार! रात्रीच्या अंधारात सगळय़ाच सावल्या गायब होतात. चंद्रप्रकाश असेल तर गोष्ट वेगळी, पण एरवी प्रत्येक रात्र जिथे दिवेही नसतील तिथे ‘शून्य’ सावलीचीच असते. आता विजेच्या प्रकाशाने 80 टक्के मानवी वस्त्या प्रकाशाने झगमगत असतात तेव्हा सावली दिसू शकते हे खरं; पण खरी दाट सावली प्रखर सूर्यप्रकाशातलीच. मध्यान्हीच्या वेळी तर गडद सावळय़ा देणारी झाडं उन्हाचे चटके बसणाऱयांना क्षणभराचा गारवा आणि विसावा देतात.

मात्र दिवसासुद्धा म्हणजे आकाश ढगाळलेलं नसताना सूर्य अगदी माथ्यावर तळपत असताना सावली ‘गायब’ झाली तर? तशी ती होण्याचा किंवा सावली अगदी पायाखाली येण्याचा अनुभव पृथ्वीवर ठराविक भागात राहणाऱयांना येतो. पृथ्वीचा अंश साडेतेवीस अंशांनी कललेला असल्यामुळे दक्षिण आणि उत्तर गोलार्धात साडेतेवीस अंशांपर्यंत सूर्याचे आसमान भ्रमण होताना दिसते. वास्तविक तो पृथ्वीच्या फिरण्याचा परिणाम आहे. परंतु ट्रेनमध्ये बसल्यावर बाहेरची स्थिर झाडं ‘पळताना’ दिसतात तसाच हा वैश्विक प्रकार.

सूर्याच्या या भारमान भ्रमणाविषयीआपण सूर्याचा इंग्रजी ‘आठ’ या आकडय़ासारखा भ्रमणमार्ग दाखवणारा ‘ऍनालेमा’ म्हणजे काय याविषयी या कॉलममधून जाणून घेतलंय. सध्या आमच्या घराच्या एका खिडकीतून सूर्याचं हे ‘उत्तरायण’ मी रोज न्याहाळतो. मुंबईत असूनही समोर फक्त एकच उंच इमारतीचा ‘टॉवर’ असल्याने तिसऱया मजल्यावरून उगवता सूर्य छान दिसतो. 21 डिसेंबरला उत्तरायण सुरू होताना सूर्य मला इमारतीच्या उजव्या बाजूला (दक्षिणेकडे) दिसायचा तो आता डाव्या बाजूला (उत्तरेकडे) गेलेला दिसतो. सकाळी पूर्वेकडे तोंड करून उभं राहिलं की उजव्या हाताला दक्षिण आणि डाव्या हाताला उत्तर दिशा येते हे साधं गणित आहे.

तर सूर्य 21 डिसेंबरला दक्षिण गोलार्धातून ‘निघाला’ की हिंदुस्थानच्या दक्षिण टोकाला असलेल्या ‘इंदिरा पॉइंट’ येथे 6 एप्रिल रोजी येतो. त्या दिवशी तेथे दुपारी बाराच्या सुमारास तो बरोबर डोक्यावर येतो आणि सावली ‘गायब’ होते. याच ठिकाणी पुन्हा असा ‘झिरो शॅडो’ येण्यासाठी 5 सप्टेंबरची वाट पाहावी लागते. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला साडेतेवीस अंशांपर्यंत असे किमान दोन झिरो शॅडो डे किंवा शून्य सावलीचे दिवस अनुभवायला मिळतात. जी गावं किंवा शहरं विषुववृत्ताच्या जवळ असतात तेथे ‘शून्य सावलीच्या दोन दिवसातलं अंतर जास्त असतं. आपण पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात असल्याने यासंदर्भात फक्त हिंदुस्थानचा विचार करा.

कन्याकुमारीचे ‘झिरो शॅडो डे’ इंदिरा पॉइंटसारखेच. हळूहळू ‘उत्तरायणा’तला सूर्य जास्तीत जास्त उज्जैन, भोपाळपर्यंत मर्यादा. दक्षिण गोलार्धात ती मकर वृत्तापर्यंत असते. आता देशातल्या कोणत्या शहरात ‘शून्य सावली’ दिवस कधी असतात ते पाहू. पणजी येथे 2 मे रोजी सूर्य माथ्यावर येऊन गेला. आता तो 10 ऑगस्टला येईल. बेळगावला तसंच सावंतवाडीला 3 मे रोजी तो मध्यान्ही माथ्यावर होता. आता परत 9 ऑगस्टला असेल. रत्नागिरीला 5 मेनंतर आता 7 ऑगस्टची वाट पाहावी लागणार. पुण्यात मात्र आजच म्हणजे 13 मे रोजी सूर्य भरदुपारी बरोबर डोक्यावर येईल आणि सावली अगदी पायात आलेली दिसेल. अर्थात कोविड निर्बंधांमुळे घराबाहेर पडू नका, पण पुढच्या वर्षासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. पुढे शक्य झालं, थोडा मोकळेपणा आला आणि वातावरण ढगाळ नसलं तर पुणे परिसरात ‘झिरो शॅडो डे’ 30 जुलै रोजी असेल. मुंबईत तशीच स्थिती 15 मे आणि 28 जुलैला येईल. या लेखातील फोटो सात वर्षांपूर्वी मुंबईतून ‘शून्य सावली’च्या दिवशी घेतलेला आहे.

महाराष्ट्रातील मेहकर म्हणजे जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे तेथून जवळच 20 मे आणि 23 जूनला तर नागपूर येथे 26 मे आणि 17 जुलै रोजी ‘झिरो शॅडो’ दिवस असतील. सूर्य कर्कवृत्तावर आला की त्याचं उत्तरायण 21 जूनला संपेल आणि दक्षिणायन सुरू होईल. भोपाळ, उज्जैन, जबलपूर येथे तो 11 ते 21 जून ते 2 जुलैपर्यंत ‘झिरो शॅडो’च्या जवळपासचे विक्रम दाखवेल. यात एक लक्षात येणारी गोष्ट म्हणजे विषुववृत्तापासून जवळ असणाऱया ठिकाणी दोन ‘शून्य सावली’ दिवसातलं अंतर जास्त तर उत्तरेकडे (व दक्षिणेकडेही) कमी असतं. कन्याकुमारीला या दोन दिवसातलं अंतर तब्बल चार महिन्यांनी तर उज्जैनला अगदी नगण्य. मुंबईत ते साधारण दोन महिन्यांचे. हे सगळं माहीत असलं तर या निसर्गचक्राचा अनुभव पुढच्या वर्षी घेता येईल, अशी अपेक्षा करूया.

 [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या