
>> संदीप विचारे
उन्हाळय़ाची सुट्टी पडली की आपल्याकडील बहुतांश लोक आपल्या गावी जातात. त्यात कोकणात जाणाऱया चाकरमान्यांचे प्रमाण अधिक असते. कुणी हिमालयीन ट्रेकींगला तर कुणी परदेशातही जातात. सुट्टी संपत आली असताना दोन/तीन दिवसांची भटकंती करण्याचा मानस असेल तर चला नगर, नाशिक, पुण्याच्या सरहद्दीवर!
मुंबईहून पहाटे लवकर निघून नाशिक रोडनी कसारा-घाटीमार्गे सिन्नर-शिर्डी रस्त्याला लागावे. सिन्नरच्या अलीकडे डावीकडे एक फाटा भगूरला जातो. होय! हेच ते भगूर जिथे स्वा. वि. दा. सावरकर यांचे बालपण गेले. त्यांचा राहता वाडा आता संरक्षित स्मारक झाले आहे. या वाडय़ास आवर्जून भेट द्या. ‘‘स्वतंत्रते भगवती’’चा मंत्र जिथे उच्चारला गेला ती ही पावन, पवित्र भूमी. गावाबाहेरील खंडोबाच्या मंदिरात स्वातंत्र्यवीर यांच्या पूजेतील अष्टभुजादेवीची मूर्ती आहे. या देवीची मूर्ती डोळय़ात साठवत ‘‘आई भवानी आम्ही येतो आम्हाला वर दे! रिपूदमनाचा आई भवानी आम्हाला वर दे!’’ मनात गुणगुणत पुन्हा घोटी-सिन्नर रस्त्यावर येऊन घोटीकडे निघायचे. वाटेत भंडारदरा फाटा लागतो. इथून भंडारदऱयाच्या दिशेने निघालो की, टाकेद गावचा रस्ता विचारायचा.
‘टाकेद’ जटायूचे मंदिर असलेले गाव. रावणाने जेव्हा सीतेला दंडकारण्यातून पळविले तेव्हा जटायूने या ठिकाणी रावणाशी युद्ध केले आणि श्रीरामांना पळून जाणाऱया रावणाची दिशा दाखवून आपला प्राण सोडला. इथे एक मोठं कुंड, साधूंचे आश्रम व जटायू मंदिर आहे. टाकेदहून राजा रविवर्मांच्या चित्रातील जटायू युद्धाचा प्रसंग आठवत पट्टा गावाकडे निघायचं. वाटते एका घाटात भव्य पवनचक्क्या आपलं लक्ष वेधून घेतात.
पूर्वी रहदारीचे मार्ग नसल्याने ट्रेकर्सची परीक्षा पाहणारा ‘पट्टा’ ऊर्फ विश्रामगड रस्त्यांच्या जाळय़ांमुळे सामान्यांच्या पट्टय़ात आला आहे. पट्टा गावाजवळ किल्ल्याच्या पायथ्याशी आपले वाहन उभे करून पट्टा किल्ला चढावयास सुरुवात करायची. गावकऱयांनी सरकारच्या मदतीने किल्ल्याची व पायऱयांची डागडुजी केली आहे. अर्धा-पाऊण तासात आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. वाटेत पट्टाई देवीचे देऊळ, बुलंद तटबंदी व साधूचा आश्रम असलेली गुहा लागते. गडावरील अंबरखान्यात शिवप्रतापाची याद आताच्या पिढीस यावी म्हणून एक चित्रप्रदर्शन व महाराजांची प्रतिमा बसविण्यात आली आहे. गडाचे आवार आणि आवाका प्रचंड आहे. संपूर्ण गड फिरल्यास खूप वेळ लागतो. छत्रपती शिवाजी महाराज विश्रांतीसाठी विश्रामगडावर मुक्कामास होते असे इतिहास सांगतो. पट्टय़ावरून ‘शिवप्रभूंची फिरे नजर अन् उभे मुलूखसारा’ असे आठवत आड, अवंढा, डुनेर गड नजरेत साठवत पट्टा उतरावा.
पट्टय़ाहून भंडारदऱयाचा रस्ता विचारून शेंडीकडे प्रस्थान करावे. शेंडी भंडारदऱयाच्या काठावर वसलेले छोटेसे गाव. इथे मुक्कामाची सोय होऊ शकते. पट्टा-शेंडी या जंगलातून वर खाली जाणाऱया वळणावळणाचा रस्ता आपणास ड्रायव्हिंगचा आनंद देऊन जातो. शेंडी-साम्रत रस्त्यावर सूर्यास्त झाल्यावर हजारो काजव्यांचे थवे झाडांवर लुकलुकताना आपण पाहू शकतो. काजवे बघण्याचा हा योग्य मौसम आहे. ‘जुगनू है कि जमी पर उतरे हुए सितारे’चा अनुभव घेत संगमनेर गाठायचे. इथे मुक्कामाची सोय आहे. जर आपण शेंडीत मुक्काम केला असाल तर सांदणव्हॅली, भंडारदरा जलाशय, अमृतेश्वर मंदिर, कोकणकडा, घाटनदेवी, रतनगड दूरदर्शन, अलंग-कुलंग, मदन कळसुबाई दूरदर्शन असा प्रचंड निसर्गाचा कॅनव्हास आपण पाहू शकतो. शेंडी-संगमनेर रस्त्यावर अकोले गावात आणि गावाजवळ टाकाहारी देवी, अगस्ती ऋषी मंदिर अशी ठिकाणं आपण पाहू शकतो.
संगमनेरहून पुण्याकडे निघालो की वाटेत हुतात्मा राजगुरूंचे राजगुरूनगर हे गाव लागते. इथे राजगुरूंचा वाडा आहे. त्यास भेट देऊन हुतात्म्यांच्या ‘मेरा रंग दे बसंती चोला…’चा एल्गार मनात रुजवत ‘चास’कडे निघावे. ‘चास’ गाव चासकमान धरणामुळे प्रसिद्ध आहे. पण चास हे थोरल्या बाजीराव पेशव्यांचे सासर. चासचे चासकर जोशी हे बाजीरावांची पत्नी काशीबाई हिचे माहेर. या गावात त्यांचा वाडा आहे. वाडय़ातील जोशी मंडळी वाडा व त्यातील काही ऐतिहासिक वस्तू पर्यटकांना आनंदाने दाखवतात. गावातील शिवमंदिरातील देखणी दीपमाळ आवर्जून पाहण्याजोगी. चास, राजगुरूनगरहून लोणावळामार्गे मुंबईस परतावे.
मुंबई, नगर, पुणे, नाशिक कुठूनही ही भ्रमंती आपण करू शकता. स्वा. सावरकर जयंती, काजवा महोत्सव, अध्यात्म, निसर्ग, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि तीनही जिल्हय़ांना स्पर्श केलेली आनंददायी अनोखी भटकंती.




























































