
>> विनायक
दिवस गणेशोत्सवाचे आहेत. घरोघरी व सार्वजनिक गणपती ठिकठिकाणी उद्या विराजमान होतील आणि हा उत्सव दहा दिवस चालेल. फार पूर्वीपासून गणेशोत्सवाची सुंदर, सुबक आरास केली जाते. साठ-सत्तर वर्षांपूर्वी घरच्या आणि उत्सवाच्या गणेशोत्सवातील मखरामध्ये आरशाचा समावेश असायचा. आजही कलात्मक कौशल्याने तो केला जातो. काही ठिकाणी तर मूर्तीच्या अनेक प्रतिमा दिसतील अशीही आरास असते. एकूणच प्रतिबिंब दाखवणारा आरसा आपल्या रोजच्या जीवनापासून अनेक उत्सवांपर्यंत सर्वत्र वापरला जातो. आरशांची नक्षी किंवा आरशांवर नक्षी साकारून आरशांचं आणि पर्यायानं सजावटीचं सौंदर्य अधिक खुलतं हे निःसंशय.
असा हा आरसा माणसाच्या आयुष्यात कधी आला? त्याला हजारो वर्षे झाली. जलाशयातलं आपलं प्रतिबिंब पाहून कोणे एकेकाळी चकित झालेल्या माणसानं त्यावर विचार केला आणि मग कालांतराने वैज्ञानिक प्रगती जसजशी होत गेली तसतसे व धातूचे आणि नंतर काचेचे आरसे अस्तित्वात आले. अगदी सिंधू संस्कृतीच्या काळातही आरसे अस्तित्वात होते असं म्हटलं जातं. या विषयावर बोलत असताना महेश नाईक यांनी नुकताच कर्नाटकातील हळेबिडू येथील मंदिरातील दर्पणसुंदरीच्या शिल्पाचा अप्रतिम फोटो पाठवताना सांगितलं, ‘‘तेराव्या शतकातील या मंदिरात सुरसुंदरी, दक्षिणसुंदरी अशी अनेक सुबक शिल्पे आहेत. दर्पण म्हणजे डाव्या हातातील आरशात आपला चेहरा न्याहाळणारी ही सुंदरी काहीशी म्लानवदना किंवा विरहिणी दिसते.’’ प्राचीन हिंदुस्थानी शिल्पकारांच्या प्रतिभेतून निर्माण झालेल्या याच प्रतिमेचा फोटो या लेखासोबत आहे. असे अनेक फोटो महेश नाईक यांच्या संग्रहात असून त्यातून आपल्याला शिल्प, दागदागिने, आरशासारख्या वस्तू यामागचं पूर्वजांचं वैज्ञानिक (गणिती) तसंच कलाकौशल्य समजून येतं.’’
असं समजलं जातं की, तप्त लाव्हारस थंड होताना जगात अनेक ठिकाणी काचगोलक (ग्लास स्पेरूल) निर्माण झाले. त्यामुळे काचेची माहिती माणसाला हजारो वर्षांपासून आहेच. त्यावर प्रक्रिया करून ती वितळवून सपाट आणि हवी तशी काचेची पट्टी बनवण्याचं तंत्रही खूप पूर्वीपासून आपल्या देशातही ठाऊक होतं. अशा काही प्राचीन भट्टय़ा उत्खननात सापडल्या आहेत.
मात्र आपल्याकडे वापरात असलेले प्राचीन आरसे बहुधा कासे या धातूचे होते. तांबे आणि टिन म्हणजे पूर्वी कल्हईसाठी वापरल्या जाणाऱ्या मऊ, शुभ्र धातूच्या मिश्रणातून ब्राँझ किंवा कास्य बनतं. अशा धातूच्या चकतीला उत्तम पॉलिश करून त्यात प्रतिबिंब दिसू शकेल असा आरसा तयार होऊ शकतो. याशिवाय ऑब्सिडियन ग्लासपासून आरसा बनवण्याची प्रक्रिया हजारो वर्षांपूर्वीची आहे, असं धातुतज्ञ योगेश सोमण यांनी सांगितलं. ते म्हणतात की, ‘‘पूर्वी पारा या धातूची वाफ (मर्क्युरी ऑक्साईड) गरम झाल्यावर काचेवर त्याचा लेप नसतो. शतकापूर्वीच्या आरशांचा मागचा भाग अशाच शेंदरी रंगाच्या लेपाचा (कोटिंगचा) असायचा.’’
हे कोटिंग कमी व्हायला लागलं की, त्या भागात फक्त पारदर्शक काच दिसायची आणि ‘आरशाचा पारा उडाला’ असं म्हटलं जायचं ते आठवतं. चांदीसारख्या महागडय़ा धातूचाही नंतर आरशाचं कोटिंग म्हणून वापर होऊ लागला. आता उत्तम ऍल्युमिनियम धातूच्या कोटिंगने चांगले आरसे बनतात. आधुनिक पद्धतीचा आरसा जस्टस लिबिग यांनी 1835 मध्ये जर्मनीत तयार केला. आरशाचं व्यापक उत्पादन होऊ लागल्यावर विविध आकारांचे आरसे जत्रेतही मिळू लागले. कच्छ भागात तर महिला कपडय़ांवर विणकाम करून त्यात टिकलीसारखे आरसे बसवू लागल्या. आजही अशी वस्त्रे पर्यटक मोठय़ा संख्येने घेतात.
आरशाच्या पेटीपासून ते ड्रेसिंग टेबलपर्यंत आणि सलोनपासून मोठमोठय़ा महालांपर्यंत आरसे प्रतिबिंबाची आरास करू लागले. ‘मोगल-ए-आझम’ चित्रपटात तर लाखो रुपयांचा खास ‘आरसेमहाल’ उभारण्यात आला. अशा गोष्टींसाठी लागणारे आरसे तयार करण्यात बेल्जियम आणि इटली हे देश प्रसिद्ध आहेत. संपूर्ण आरशाचं दार असलेली शे-दोनशे वर्षांची लाकडी कपाटं आजही या ‘बेल्जन’ आरशांची मिरासदारी मिरवतात. या ठिकाणी बनणाऱ्या काचेची सपाटी (प्लॅटनेस) सर्वत्र समान असते. त्यामुळे प्रतिबिंब वस्तू किंवा व्यक्ती असेल तसेच तंतोतंत दिसते.
एरवी काही विज्ञान केंद्रांमध्येही कॉन्केव्ह (अंतर्गोल) आणि कॉन्व्हेक्स (बर्हिगोल) आरशांमधल्या आपल्याच प्रतिबिंबांची गंमत अनुभवता येते. असे आरसे बुटक्याला ‘उंच’ आणि हडकुळय़ा व्यक्तीला ‘लठ्ठ’ करतात. स्वतःचं प्रतिबिंब पाहणं (विशेषतः तरुण वयात) माणसाला फार आवडतं. ग्रीक कथेतला नार्सिसस नावाचा तरुण तर तलावातील स्वतःच्याच प्रतिबिंबावर लुब्ध झाल्याची कथा आहे. अशा साहित्यिक गोष्टी आरशाचा शोध लागण्यापूर्वीच्या असतील, पण विज्ञानात अवकाशातील ग्रह-ताऱ्यांचं सुस्पष्ट दर्शन होण्यासाठीही वैज्ञानिक न्यूटन यांनी आरशाची दुर्बीण बनवली. ती आजही वापरली जाते, तर पहिल्या मराठी वृत्तपत्राचं नाव ‘दर्पण’ म्हणजे (वैचारिक) आरसा असंच होतं. असा हा आरसा रोजच्या जीवनातला आणि विज्ञान-कलेमधलाही! दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हियात असलेलं 10 हजार चौ.कि.मीटरचं सॉल्ट लेक हा पृथ्वीवरचा सर्वात मोठा आरसा आहे, असं म्हटलं जातं.