
कोरोनाकाळात निर्बंध असताना आरटीओमध्ये जाता येत नसल्याने नागरिकांच्या सुविधेसाठी परिवहन विभागाने ऑनलाइन शिकाऊ वाहन चालक परवाना देण्यास सुरुवात केली खरी, परंतु हा ऑनलाइन शिकाऊ वाहन परवाना देताना दहावीच्या परीक्षेत जसे ‘डमी उमेदवार’ बसतात तसे प्रकार सुरू झाल्याने गडबड होऊ लागली. त्यामुळे परिवहन विभागाने आता आर्टीफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या ‘फेसलेस’ तंत्राचे उद्घाटन आज गुरुवार, 2 जून रोजी परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांच्या हस्ते होत आहे. त्यामुळे डमी उमेदवार बसविणे अशक्य होईल असे म्हटले जात आहे.
कोरोना लाटेत नागरिकांवर बंधने असल्याने त्यांना सोयीचे व्हावे म्हणून एप्रिल 2021 पासून शिकाऊ वाहन परवान्यासाठी घरबसल्या ऑनलाइन परीक्षा देण्याची प्रक्रिया आरटीओने सुरू केली; परंतु दलालांनी त्यावर कडी करीत स्वतःच चाचणी देऊन उमेदवारांना परीक्षेतून सूट दिली. त्यामुळे कोणालाही लायसन्स मिळू लागले. ‘शिकाऊ वाहन परवाना घरबसल्या मिळवा’ अशा दलालांच्या जाहिरातीही निघाल्याने चिंता वाढली. चाचणी न देता ‘लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स’ अगदी व्हॉट्सअॅपवर मिळू लागल्याने राज्यभरातून परिवहन विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
धोका वाढला होता…
शिकाऊ वाहन परवाना हा उमेदवाराला वाहन चालविणे शिकण्यासाठी मिळालेला असतो. तो केवळ सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असतो. त्यानंतर ‘पक्के लायसन्स’ बनवावे लागते. शिकाऊ व्यक्ती गाडी चालवत असताना त्याच्या शेजारी पक्के ड्रायव्हिंग लायसन्स असलेली व्यक्ती बसणे गरजेचे असते. असे कोणालाही शिकाऊ लायसन्स मिळाल्याने चुकीच्या हाती स्टेअरिंग गेल्याने अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
डमीचा खेळ खल्लास….
संगणकाचा वेब कॅमेरा ऑन झाल्यावर उमेदवाराला हळूच बाजूला करीत दलाल लोकच स्वतः चाचणी द्यायचे; परंतु आता स्क्रिनवर जरा जरी हालचाल झाली तरी चाचणीची ऑनलाइन संगणकीय प्रक्रिया आपोआप बंद होईल. तसेच आधार कार्डवरील उमेदवाराच्या फोटोला ओळखूनच चाचणी सुरू होईल. त्यामुळे डमी उमेदवार चाचणीला बसण्याची शक्यता नष्ट होईल. त्यासाठी ‘सारथी’ सॉफ्टवेअरमध्ये बदल केले असून गुरुवार, 2 जूनपासून ही प्रणाली लागू होईल असे सूत्रांनी स्पष्ट केले.



























































