
आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाच्या नूतनीकरणात झालेल्या कथित अनियमितता आणि गैरव्यवहारांची प्राथमिक चौकशी सीबीआय करणार आहे. सीबीआयने यासाठी दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सर्व कागदपत्रे, निविदा, कंत्राटे, सामग्री खरेदी, कार्यादेश, आराखडे, निवासस्थानातील सुविधांबद्दल केजरीवाल यांनी दिलेले आदेश-सूचना आदी सर्व तपशिलाच्या फायली देण्याची मागणी केली आहे. भाजपने या नूतनीकरणावर कोटय़वधींचा खर्च झाल्याचा आरोप केला आहे. ‘आप’ने अर्थातच गैरव्यवहारांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
प्रकरण नेमके काय…
केजरीवाल यांचे 6 फ्लॅग रोडवर निवासस्थान आहे. या जुन्या निवासस्थानाच्या नूतनीकरणादरम्यान प्रत्येकी 8 लाख रुपयांचे 23 पडदे, 4 कोटी किंमतीचे लाकूडसामान आणि 1 कोटी 15 लाखांचे व्हीएतनामी संगमरवर लावण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. पुनर्बांधणीच्या नावाखाली पीडब्ल्यूडीने नवीन बंगलाच उभारल्याचा आरोप होत आहे.

























































