मुख्यमंत्र्यांनी फोडाफोडीचे राजकारण थांबवून विकासाकडे लक्ष द्यावे: अशोक चव्हाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

भाजपा सरकारने शासकीय यंत्रणांचा धाडी टाकण्यासाठी गैरवापर करुन विरोधी पक्षातील नेत्यांसह आमदारांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी फोडाफोडीचे राजकारण थांबवून विकासाकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही चव्हाण यांनी केले. अर्धापूरात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

अर्धापूर येथील नगरपंचायतच्या वतीने 27 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन करुन तालाब मैदानावर रविवारी माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की, राज्यातील सरकार जनतेची दिशाभूल करुन अनेक फसव्या घोषणा करत आहे. आयाराम-गयारामांना पक्ष सोडायचा असल्यास तर खुशाल सोडावा. मराठवाड्याचे पाणी अडविण्याचा प्रयत्न होत असून आपण रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी दिला. आगामी निवडणूकीत मतदान प्रक्रिया बँलेट पेपरवर घेण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. नांदेड जिल्ह्यात प्रशासन आणि सत्ताधारी यांनी संगनमत करून प्रचंड प्रमाणात वाळू उपसा सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी आमदार डी.पी.सावंत, आमदार वसंतराव चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हरिभाऊ शेळके, प्रदेश सरचिटणीस बी.आर.कदम, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर आदी उपस्थित होते.