
सामना प्रतिनिधी, मुंबई
काँग्रेस सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या ‘ऑगस्टा वेस्टलॅण्ड’ या कंपनीला ‘मेक इन इंडिया’त सहभागी करून घेण्याइतके मोदी सरकार मेहेरबान का झाले, त्या कंपनीला कंत्राट कसे दिले असा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज केला. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. ख्रिस्तियन मिशेल या दलालाच्या मागे लपून मोदी सरकार स्वतःचे घोटाळे लपवू पाहत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच आहेत असे त्यांनी सांगितले. फडणवीस यांनी आधी ‘सहारा’च्या डायरीतील भाजप नेत्यांच्या नावांबद्दल बोलावे व नंतर त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांकडे स्पष्टीकरण मागावे असा टोला चव्हाण यांनी लगावला.




























































