तुळजाभवानी देवीच्या पलंगाचे घेतले आष्टीतील भाविकांनी दर्शन

728

घोडेगाव ता.आंबेगाव जिल्हा पुणे येथून श्री. क्षेत्र तुळजापूरकडे निघालेल्या तुळजाभवानी देवीच्‍या मानाच्‍या पलंगाचे आष्टी शहरात सकाळी आगमन झाले. यावेळी या पलंगाच्या स्वागतासाठी आणि दर्शनासाठी भक्तांचा महापूर लोटला.

सुमारे 800 वर्षापूर्वीची  परंपरा असलेल्या या देवीचा पलंग साग, आंब्याचे लाकूड या आधारे तयार करण्यात येतो. या पलंगाचे ऋषीपंचमीला तुळजापूरकडे प्रस्थान सुरु होते.घोडेगाव, जुन्नर, आळेफाटा, अहमदनगर, चिचोंडी, पुंडी, हिरा, खुंटेफळ, लोणी, वाटेफळ, आष्टी, जामखेड, तुळजापूर असा या पलंगाचा प्रवास असतो. आष्टी शहरात या पलंगाचे  आज दि. 5 ऑक्टोबर रोजी आगमन झाले. अनेक पिढ्यानपिढ्या शहरातील कसबा पेठेत एकशिंगे यांच्या निवासस्थानी या पलंगाचे स्वागत होते. पलंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.  शहरात ठीक-ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी  गर्दी असते. घटस्थापनेच्या सातव्या माळेला सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आष्टी शहरात हा देवीचा पलंग पोहचतो. नंतर जामखेड मार्गे तुळजापुरला  दस-याच्या पूर्वसंध्येला तुळजाभवानी मातेच्या मंदिरात पोहचत असल्याचे भविकामधून  सांगितले जाते. तुळजापुरला पलंग पोहचल्यानंतर विजयादशमी ते कोजागीरी पौर्णिमे पर्यंत या पलंगावर तुळजाभवानी माता निद्रा घेते. नंतर हा पलंग होमात विसर्जीत केला जातो.

आपली प्रतिक्रिया द्या