
सामना प्रतिनिधी । अलिबाग
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे खून खटल्याची सुनावणी अलिबाग सत्र न्यायालयात सुरू आहे. या खटल्यातील दोन नंबरचा आरोपी राजेश पाटील याला दोषमुक्त करण्याबाबत आरोपी पक्षाच्या वकिलामार्फत युक्तिवाद केला असून तो विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी खोडून काढला आहे. तर आरोपी एक अभय कुरुंदकर याचा जामिनासाठीचा अर्ज आरोपी वकिलाकडून न्यायालयात दाखल केला आहे. जामीन अर्जावर व आरोप निश्चितीबाबत 11 जून रोजी सत्र न्यायाधीश एम. जे. मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.
अश्विनी बिंद्रे खून प्रकरणाची सुनावणी अलिबाग सत्र न्यायाधीश एम. जे. मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात सुरू आहे. आरोपी विरोधात आरोप निश्चित करण्याबाबत विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप पाटील यांनी 3 जूनच्या सुनावणीवेळी युक्तिवाद केला होता. त्यावर गुरुवारी आरोपी पक्षातर्फे उत्तर देण्यासाठी सुनावणी होणार होती. त्यानुसार या खटल्यातील आरोपी नंबर दोन राजेश पाटील याच्या विरोधात कोणताही पुरावा नसल्याचे सांगत आरोपीचे वकील अॅड. प्रसाद पाटील यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने आरोपीच्या वकिलाच्या युक्तीवादावर विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले. घरत यांनी राजेश पाटील याला का दोषमुक्त करू नये तसेच त्याच्या विरोधात असलेले पुरावे याबाबत युक्तिवाद केला.
अश्विनी बिंद्रे खून प्रकरणातील मुख्य एक नंबर आरोपी अभय कुरुंदकर याच्याबाबत युक्तिवाद करण्यास आरोपीच्या वकिलांना सांगितले तेव्हा त्यांनी आरोपीला जामीन द्यावा यासाठी अर्ज केला आहे. यावेळी आरोपी पक्षाचे वकील अॅड. प्रसाद पाटील यांनी आरोपी विरोधात आरोप निश्चित होण्यापूर्वी जामीन अर्जावर सुनावणी व्हावी असे सांगितले. त्यावेळी न्यायालयाने सांगितले की चार्जशीटप्रमाणे युक्तिवाद करण्याचा तुम्हाला हक्क आहे. त्यावर आरोपीच्या वकिलांनी आम्हाला जामिनावर युक्तिवाद करायचे आहे असे सांगितले. त्यावेळी न्यायालयाने सांगितले की जामिन अर्ज व युक्तिवाद या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे आरोपनिश्चितीबाबत 11 जूनला सुनावणी ठेवतो असे न्यायालयाने सांगितले.





























































