
तळेबाजार येथील मानाच्या समजल्या जाणाऱ्या होममिनिस्टर स्पर्धेत अश्विनी महादेव इथापे विजयी ठरल्या, तर पूजा विनायक धुरी उपविजेत्या ठरल्या आहेत तसेच तृतीय क्रमांक सुविधा सुहास झोरे यांनी पटकावला आहे.
नवतरुण उत्साही मंडळ तळेबाजारच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त दांडिया आणि रास-गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी खास महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ ही होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर गणेश उत्साही मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, प्रायोजक विश्वनाथ गिरकर, वरेरी माजी सरपंच संदीप तेली, सचिव संजय रुमडे, रोहित म्हापसेकर मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा नवतरुण मंडळाचे रोहित म्हापसेकर, गणेश उत्साही मंडळाचे आधारस्तंभ दत्तप्रसाद जोईल उपस्थित होते.
तळवडे ग्रामपंचायत सदस्य तिमिर माणगांवकर, मराठी माणसाचा गजर मित्र परिवार अध्यक्ष प्रविण पारकर आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना मानाची पैठण, रोख बक्षीस आणि रक्कम देऊन गौरवण्यात आले. अतिशय रंगतदार झालेल्या या होम मिनिस्टर स्पर्धेचे सूत्रसंचालन कोल्हापूरचे अमृत चव्हाण यांनी केलं. यावेळी प्रश्नमंजुशा स्पर्धेत अचूक उत्तरे देणाऱ्या स्पर्धकांना श्री गणेश उत्साही मंडळातर्फे प्रिया म्हापसेकर, हेमा म्हापसेकर, रोहन म्हापसेकर, सुधीर म्हापसेकर, वैभव मल्हार, सनित कदम, संकेत कदम, शुभम तावडे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. यामध्ये स्पर्धक अवंती महाडिक, अनिता पवार, ज्योती मोरे या विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला.


























































