
चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानच्या संघाने फायनलमध्ये झोकात प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्यफेरीच्या लढतीत हिंदुस्थानच्या युवा खेळाडूंनी बांगलादेशचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला.
बांगलादेशने विजयासाठी दिलेले 97 धावांचे आव्हान हिंदुस्थानने एका गड्याच्या मोबदल्यात 9.2 षटकांमध्ये पूर्ण केले. क्रिकेटचा संघ फायनलमध्ये पोहोचल्याने हिंदुस्थानचे आणखी एक पदक पक्के झाले आहे.
India Won by 9 Wicket(s) https://t.co/75NYqhTEac #INDvBAN #IndiaAtAG22
— BCCI (@BCCI) October 6, 2023
बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या नाममात्र आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाला. मात्र त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा यांनी अधिक पडझड होऊ न देता संघाला 64 चेंडू बाकी असताना विजय मिळवून दिला. गायकवाड याने 26 चेंडूत नाबाद 40 (4 चौकार आणि 3 षटकार), तर तिलक वर्माने 25 चेंडूत नाबाद 55 धावांची (2 चौकार आणि 6 षटकार) अर्धशतकीय खेळी केली.
तत्पूर्वी हिंदुस्थानने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. बांगलादेशने निर्धारित 20 षटकात 9 बाद 96 धावा केल्या. बांगलादेशचे फक्त 3 खेळाडू 10 धावांचा आकडा पार करू शकले. हिंदुस्थानकडून साई किशोरने सर्वाधिक 3, तर वाशिंग्टन सुंदरने 2 विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि शाहबाज अहमद यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
Shubman Gill – टीम इंडियाला मोठा धक्का, सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण



























































