Shubman Gill – टीम इंडियाला मोठा धक्का, सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण

आयसीसी वन डे वर्ल्डकपला गुरुवारी 5 ऑक्टोबरपासून मोठ्या झोकात सुरूवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड संघात सलामीचा सामना रंगला. हा सामना न्यूझीलंडने 9 गडी राखून वर्ल्डकपच्या अभियानाचा श्रीगणेशा केला. आज पाकिस्तान आणि नेदरलँड संघात सामना होणार आहे, तर यजमान हिंदुस्थानचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. मात्र या लढतीपूर्वी हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे.

हिंदुस्थानचा सलामीवीर आणि सध्या तुफान फॉर्मात असणाऱ्या शुभमन गिल (Shubman Gill) याला डेंग्यूची लागण झाली आहे. यामुळे रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सलामीच्या लढतीला मुकण्याची शक्यता आहे. गुरुवारी झालेल्या सराव सत्रामध्येही तो सहभागी झाला नाही. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, शुभमन गिल याची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे. रविवारी हिंदुस्थान विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये चेन्नईत सामना असून या लढतीसाठी गिल उपलब्ध आहे अथवा नाही याचा निर्णय संघ व्यवस्थापन शुक्रवारी घेणार आहे. गिलच्या आणखी काही चाचण्या केल्या जाणार असून यानंतर तो पहिला सामना खेळणार की नाही हे स्पष्ट होईल.

दमदार फॉर्म

शुभमन गिल हा सध्या दमदार फॉर्मात आहे. नुकत्याच झालेल्या आशिया कप स्पर्धेत गिलने 302 धावा केल्या. तसेच गेल्या काही डावात गिलची कामगिरी 104, 74, नाबदा 27, 121, 19, 58 आणि नाबाद 67 अशी जबरदस्त राहिली आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरला नाही तर हिंदुस्थानसाठी मोठा धक्का असणार आहे.

गिल खेळला नाही तर कोण आहे दावेदार?

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या लढतीत शुभमन गिल खेळला नाही तर रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार हा प्रश्न आहे. अशा स्थितीमध्ये डावखुरा फलंदाज ईशान किशन सलामीला येऊ शकतो. तसेच के.एल. राहुल हा देखील एक पर्याय हिंदुस्थानकडे आहे. दुखापतीनंतर पुनरागमन केलेल्या राहुने आशिया कपमध्ये चांगली कामगिरी केली होती.