विज्ञान-रंजन – हॅट्स ऑफ, व्हॉएजर!

>> विनायक

ग्रेट! ‘व्हॉएजर-1’ यानाची कामगिरी आणि वैज्ञानिकांचं यश या दोन्हीचंही कौतुक करावं तेवढं थोडंच. पार आपल्या सूर्यमालेपलीकडे पोचलेल्या या आजच्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत प्राथमिक वाटणं यानाची केवळ कमाल आहे. यात विज्ञान तर आहेच, पण त्यावर खरोखरच ‘रंजन’ही आहे ते म्हणजे पृथ्वीवासीयांची माहिती आणि सांगीतिक स्वरही नोंदलेली ‘गोल्डन डिस्क’! त्यावर आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका केसरबाई केरकर यांनी गायिलेली ‘जात कहां हो’ ही भैरवीसुद्धा आहे.

आपली ग्रहमाला सोडून ‘आऊटर स्पेस’मध्ये गेलेल्या या यानाचा प्रवास आणखी कुठवर असणार आहे हे वैज्ञानिकांनाही सांगता यायचं नाही. अनेकदा संपर्क तुटल्यामुळे, ‘आता बहुतेक ‘व्हॉएजर’ आपल्या आवाक्याबाहेर गेलं’ असं वाटत असतानाच त्याचा पुन्हा ‘संदेश’ येतो आणि ते कुठे आहे ते समजतं. परवा 20 एप्रिलला पाच महिन्यांनी अचानक त्याचा संपर्क पुन्हा सुरू झाला आणि या यानाची माहिती सातत्याने घेण्यासाठी सजग असलेला वैज्ञानिकांचा गट अगदी आनंदून गेला. जे यान बहुधा यापुढे कधीच संपर्क साधणार नाही असं वाटलं होतं आणि म्हणून आपण त्याला निरोप दिला होता, परंतु काही वेळा विज्ञानातही ‘चमत्कार’ घडतात, त्याप्रमाणे ‘व्हॉएजर’ जागं झालं ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे. खरोखरच ‘जात कहां हो?’ या प्रश्नाचं उत्तर ‘व्हॉएजर’ त्याच्या प्र्रवासातून देतंय. अधिकाधिक माहिती पाठवतंय. सूर्यमालिकेपल्याड काय आहे ते सांगतंय. हे सर्व काही विलक्षणच म्हणावं लागेल.

अर्थात ते कुठल्या दिशेनं जातंय? असा प्रश्न विचारण्यात अर्थ नाही. कारण ‘दिशा’ ही गोष्ट पृथ्वीवर राहणाऱयांपुरती आहे. अंतराळात वर, खाली, पूर्व, पश्चिम काहीच नाही. त्यासाठी आपण जे संदर्भ (रेफरन्स) मानतो ते तिथे कुठे असणार? त्यामुळे ‘व्हॉएजर’चा प्रवास सूर्यमालेपलीकडे सुरू आहे एवढंच लक्षात येतं आणि तेच अधिक महत्त्वाचं. गेल्या पाच महिन्यांत थबकलेला संपर्क पुनर्प्रस्थापित करत ‘व्हॉएजर’ माहितीपूर्ण (रिडेबल) डेटा पाठवायला लागलंय हे काय कमी आहे! कारण 14 नोव्हेंबर 2023 रोजी ते जे ‘गप्प’ झालं ते पुन्हा 20 एप्रिल 2024 पासून पृथ्वीवासीयांसोबत गप्पागोष्टी करू लागलं आहे. तसं पाहिलं तर ‘गप्प आणि गप्पा’ या दोन विरुद्ध अभिव्यक्ती आपण आपल्या भाषेत फक्त एक काना देऊन व्यक्त करतो. तसंच काहीसं घडलंय. ‘व्हॉएजर’चा ‘पॉझ’ संपलाय. ‘गप्प’ला एक ‘काना’ परत मिळालाय आणि तोसुद्धा आता काही त्याबाबत आपली मात्रा चालत नाही असं वैज्ञानिकांना वाटत असताना. त्यामुळे ‘नासा’च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीच्या (जेपीएल) वैज्ञानिकांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱयावर दिसतोय. या पराक्रमी ‘व्हॉएजर’ची थोडी उजळणी.

कधी निघालंय हे ‘व्हॉएजर’ अंतराळ प्रवासाला? तारीख आहे 5 सप्टेंबर 1977. तब्बल 47 वर्षांपूर्वी. याचाच अर्थ त्याचा अव्याहत प्रवास इतकी वर्षे सुरू आहे आणि त्याने सुमारे 25 अब्ज किलोमीटर भ्रमंती केली आहे. पृथ्वी ते सूर्य हे अंतर केवळ 15 कोटी किलोमीटर आहे, त्या तुलनेत ‘व्हॉएजर’च्या या प्रवासाची कल्पना किंवा गणित करून बघा.

रशियाचा ‘स्पुटनिक-1’ हा जगातला पहिला कृत्रिम उपग्रह 4 ऑक्टोबर 1957 रोजी अवकाशात गेला. त्यावर आर. के. लक्ष्मण यांनी लगेच ‘रशियाचा सर्वात प्रभावी रेव्हल्युशनरी’ (क्रांतिकारक) असं त्या यानाला म्हटलं होतं. कारण स्पुटनिक पृथ्वीभोवती 90 मिनिटांत एक ‘रेव्हल्युशन’ (परिक्रमा) करत होता. त्या शब्दावरची लक्ष्मण यांची ती चमकदार ‘कोटी’ होती. आता 25 अब्ज किलोमीटर दूर गेलेल्या या ‘व्हॉएजर’ नामक प्रवाशाला त्यांनी कोणत्या व्यंगचित्रात व्यक्त केलं असतं? कदाचित त्यांनी त्याला ‘सातत्यपूर्ण प्रवासी’ म्हटलं असतं… आणि त्यातून काही सामाजिक टिपणीही केली असती.

मात्र ‘व्हॉएजर’ची ही चिकाटी, हे यश एका ‘स्वयंचलित’ केलेल्या यानाचं तर आहेच, पण इतकं सक्षम यान बनवणाऱया वैज्ञानिकांचंही आहे. सूर्याचं प्रभामंडळ आणि ग्रहमालिकेपलीकडे असलेलं द्रव्य-माध्यम (इन्टरस्टेलर मीडियम) याचा अभ्यास करण्यासाठी 1977 मध्ये ते ‘नासा’ने अवकाशात सोडलं. त्यांच्या ‘जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी’ने त्याची उभारणी केली. 729 किलो वजनाचं हे यान उड्डाणाच्या वेळी 470 वॉट ऊर्जास्रोतासह अवकाशात गेलं. ते गुरू ग्रहापाशी 5 मार्च 1979 आणि शनीजवळ 12 नोव्हेंबर 1980 रोजी गेलं. नंतर युरेनस, नेपच्यून, प्लुटो, किपरबेल्ट असं करत करत त्याचा प्रवास सौर ऊर्जा मिळवत सुरू राहिला.

1980 नंतर त्याने थेट 2017 मध्ये त्याचं ‘थ्रस्टर’ प्रज्वलित करून आपली योग्य ती कक्षा स्वीकारली. या सर्व प्रवासात ते पृथ्वीवर सातत्याने माहिती पाठवत होतं. 2023 मध्ये असा ‘डेटा’ येणं बंद झाल्यावर या यानाने प्रदीर्घ काळ केलेली सेवा लक्षात घेता ते आता थकलं किंवा संपलं असेल अशी शंका वैज्ञानिकांनाही आली, पण जपानचं ‘स्लिम’ चांद्रयान जसं त्याच्या काळझोपेतून अचानक जागं झालं आणि कललेल्या अवस्थेतही पुन्हा माहिती पाठवू लागलं ही अलीकडच्या, परंतु अगदी जवळ असलेल्या चंद्रासंदर्भातली गोष्टसुद्धा उमेद देणारी ठरली. मग 25 अब्ज किलोमीटर दूरवरून ‘माणसांसाठी’ कार्यरत असणाऱया ‘व्हॉएजर-1’ यानाचा अभिमान वाटायलाच हवा!