आपची सत्ता असल्याने केंद्र सरकारने दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा दिला नाही, आदित्य ठाकरेंचा घणाघात

दिल्लीतील सात लोकसभेच्या जागांसाठी येत्या 25 मे रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट करत केंद्रातील भाजप सरकारला फटकारले आहे.

”भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार असल्याचे वचन दिले आहे. पण त्यांना दिल्ली जिंकता आली नाही आणि तिथे पुन्हा एकदा आम आदमी पार्टीची सत्ता आल्याने केंद्र सरकारने दिल्लीच्या जनतेला दिलेले वचन पूर्ण केले नाही”, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला. ‘X’ या समाजमाध्यमावर आदित्य ठाकरेंनी ट्विट करत भाजपला फटकारले.

या ट्विटमधून त्यांनी दिल्लीतील जनतेला सवाल देखील केला आहे. ”आपल्या राजकीय अहंकारासाठी दिल्लीतील जनतेला आणि दिल्लीकरांनी निवडून दिलेल्या सरकारचा छळ करणाऱ्यांना तुम्ही पुन्हा मत देणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.