सोलापुरात जातीय दंगली घडविण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न होता

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही आपल्या हातून गेल्याची जाणीव होताच, निवडणुकीदरम्यान सोलापुरात हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करून जातीय दंगल घडवून 2002ची पुनरावृत्ती करण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या स्थानिक नेतेमंडळींचा प्रयत्न होता, असा थेट आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. यावेळी पोलीस यंत्रणा सतर्क राहिल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. निवडणुका शांततेत पार पडल्या, असेही त्यांनी सांगितले.

दक्षिण सोलापूर तालुक्यात आयोजित कृतज्ञता मेळाव्यात बोलताना प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करीत थेट आरोप केला.

देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात दंगल घडवण्याचा डाव होता. लाकसभेची निवडणूक त्यांच्या हातून गेली म्हणून ही कटकारस्थानं त्यांनी केली. त्यांची मतदानाच्या अगोदरची पाच दिवसांची भाषणे काढून बघा. त्यांच्या हालचाली तशाच होत्या. मतदानाच्या दिवशी पोलीस आयुक्त सतर्क राहिले. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिलावळ रक्ताचं राजकारण करायला बघत होती. लाज वाटायला पाहिजे. चार हुतात्म्यांच्या शहरात येऊन आपल्यात भांडणे लावून, दंगल घडविण्याचा प्रयत्न होता. मतमोजणीदिवशी काय झाले हे सर्वांना माहीत आहे. शेवटी पोलिसांनी उमेदवारांवर गुन्हे दाखल करतो, असा सज्जड दम दिल्यावर भाजप कार्यकर्ते पसार झाले. हे सर्व रेकॉर्ड आहे, असेही खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्यासह तालुक्यातील अनेक काँग्रेसचे नेते उपस्थित होते.