प्यार किया तो डरना क्या… फिलिपिन्सची तरुणी प्रियकरासाठी पोहोचली राजस्थानात

प्रेम हे आंधळं असतं. प्रेमासाठी वाट्टेल ते करायची प्रेमीयुगुलांची तयारी असते. फिलिपिन्सला राहणारी मेरी नावाची तरुणी फेसबुकवरील प्रियकराला भेटण्यासाठी थेट सात समुद्र ओलांडून राजस्थानच्या वाळवंटात दाखल झाली आहे. ती आता या तरुणाशी लग्नगाठ बांधणार आहे. मेरी आणि राजस्थानच्या बुंदी येथील तरुण मुकेश शर्मा यांची फेसबुकवर 14 वर्षांपूर्वी मैत्री झाली. सुरुवातीला मैत्री आणि नंतर दोघांमध्ये प्रेम जुळले. मुकेश हा गावात दुकान चालवतो. मुकेश दुकानदार असूनही मेरी सर्व काही सोडून त्याच्यासाठी गावात दाखल झाली आहे. या दोघांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशी महिला आपल्या घरची सून होणार असल्याने मुकेशच्या कुटुंबीयात आनंदाचे वातावरण आहे. तसेच मेरीला पाहण्यासाठी लोक घरी येत आहेत. मेरी गावात आल्यानंतर ढोल-ताशा लावून तिचे जंगी स्वागत करण्यात आले. महिलेचा पासपोर्ट आणि व्हिसा तपासला जात आहे, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक उमा शर्मा यांनी सांगितले.