वळीवाच्या पावसाने महावितरणचे चारशे विद्युत खांब बाधित, धोपेश्वर येथील 50 कुटुंबांना स्थलांतरणाच्या सूचना

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या वळिवाच्या पावसाने सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि सावर्डे परिसरात महावितरणच्या 400 विद्युत खांबांचे सुमारे दीड कोटीचे नुकसान झाले. शेतीचे 29.6 हेक्टरचे तर अंगणवाड्यांचे 2 लाख 10 हजाराचे नुकसान झाले आहे. दरड प्रवण क्षेत्राचीही पाहणी केली आहे. सध्या अतिसंवेदनशील म्हणून राजापूरातील धोपेश्वर हे आहे. त्याभागात 50 कुटुंब असून त्यांना स्थलांतराबाबत सुचना दिल्या आहेत. त्यापैकी 100 लोकांशी चर्चा झाली असून ते स्थलांतरित होण्यासाठी तयार आहेत. संगमेश्वर तालुक्यातील एक गाव असून त्यांनाही स्थलांतराबाबत सूचना केल्या आहेतअशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.

आपत्कालीन बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदते ते बोलत होते. यावेळी अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सिंह म्हणाले, जिल्ह्यात साधारण सरासरी 3,264 मीमी पाऊस पडतो. 1 जून पासून याची नोंद केली जाते. आता साधारण 39.5 मीमी पाऊस झाला. यामध्ये 29.6 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्याचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे तुरंबव, सावर्डेमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्राहक अंधारत होते. काल तुरंबव येथील विद्युत पुरवठा सुरळीत झाला. आज उर्वरित ठिकाणचा झाला. लांज्यातही परवापासून विद्युत पुरवठा खंडित होते, तो सुरू करण्यात आला आहे. यामध्ये महावितरणचे डीपी, विद्युत खांब आदीचे नुकसान झाले आहे.

या नैसर्गिक आपत्तीमध्ये महावितरणचे 400 विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी 200 खांबांची दुरूस्ती झाली आहे. 132 खांबाचे दुरूस्तीचे काम सुरू आहे. साधारण 21 हजार 805 ग्राहक बाधित झाले. यामध्ये महावितरणचे दीड कोटीचे नुकासान झाले आहे. घरे, शाळांचे कोणतेही मोठे नुकसान नाही. परंतु अंगणावाड्यांचे सोनगाव, खेड रिंगणे, लांजा, तळवडे आदीचे 2 लाख 10 हजाराचे नुकसान आहे. जिल्ह्यातील दरड प्रवण भागातही विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत.. पाणी टंचाईचा आढावा घेतला आहे. सुमारे 91 गावांमध्ये 228 वांड्यांना 24 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत 1 हजार 572 टॅंकरच्या फेऱ्या झाल्या आहेत, असे सिंह यांनी सांगितले.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये यंत्रणा अधिक सक्षण करण्यात आली आहे. त्यासाठी 12 सॅटेलाईट फोन घेण्यात आले आहे. तर पोलिस खात्याकडे 6 फोन आहेत. त्यामुळे संपर्क करायला सोपे जाणार आहे. 94 ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आली आहेत.