ट्रॅक्टर ट्रॉली आणि मोटार सायकलचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

ट्रॅक्टरची ट्रॉली व मोटारसायकलची झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी व पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची व काळजाला थरकाप सुटणारी दुर्दैवी घटना 23 मे रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रं.161 अ वर दुपारी बिहारीपुर नजीक घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातील परतपूर वस्तीवाढ येथील मोसीन गन्नीसाब शेख व पत्नी फरीदा मोसिन शेख व पाच वर्षाचा मुलगा जुनेद मोशीन शेख हे तिघे गुरुवारी सकाळी गटाचे काम असल्यामुळे मुखेडला गेले होते. तेथील सर्व कामे आटोपून परतीच्या प्रवासाला मोटारसायकलवरून परतपूर गावाकडे निघाले. अंदाजे दुपारी दोन वाजता बिहारीपुर नजीक राष्ट्रीय महामार्गावरील आले असता त्यांच्यावर काळाने झडप घातली. यात मोसीन शेख यांच्या गाडीची व ट्रँलीची जोरदार धडक होती. या अपघातात धडकेत पती-पत्नी मुलगा हे तिघेही सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर जोरात आपटल्याने सर्वांच्या डोक्यांना गंभीर मार लागून रक्तस्त्राव झाल्याने दुचाकीस्वार मोसीन गन्नीसाब व पत्नी फरीदा मोसीन शेख या दोघांचा जागीच मृत्यू झाला व पाच वर्षाचा मुलगा जुनेद शेख याचा उपचारा दरम्यान उदगीर येथे मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना वार्‍यासारखी पसरताच मुक्रमाबाद, परतपूर, रावी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुक्रमाबाद, परतपुर या गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी गावातील स्थानिक रहिवाशांनी मदत केली असून, या तिघांवर प्राथमिक आरोग्य केंद्र मुक्रमाबाद येथे शवविच्छेदन करण्यात आले. वृत्त लिहिपर्यंत पोलीस दरबारी कोणतीही नोंद झाली नाही. मोसीन शेख यांच्या पश्चात आई, वडील सात वर्षाची मुलगी, बहिणी, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे. राष्ट्रीय महामार्गावर दोन वर्षात अनेक तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. तरी याबाबत शासनाने प्रवाशांच्या हिताचे नियोजन प्रभावीपणे राबवावेत, अशी मागणी होत आहे.