परत ये… माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नको; प्रज्ज्वल रेवन्नाला माजी पंतप्रधानांचा इशारा

ऐन लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमधील धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (JDS) खासदार आणि लोकसभा निवडणुकीतील हासन मतदारसंघाचे उमेदवार प्रज्ज्वल रेवन्ना यांचे सेक्स स्कँडल समोर आल्याने एकच खळबळ उडाली. हे प्रकरण उघड होताच प्रज्ज्वल रेवन्ना विदेशात पळून गेले. आता प्रज्ज्वल रेवन्नाचे आजोबा माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांनी आपल्या नातावला थेट इशारा दिला आहे. तसेच तत्काळ हिंदुस्थानात परतण्याची सूचनाही केली आहे.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी यासंबंधी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ‘जिथे कुठे असशील तिथून परत ये. आणि कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य कर. माझ्या धैर्याची आणखी परीक्षा घेऊ नको, अशा कडक शब्दांत मी प्रज्ज्वल रेवन्नाला इशारा दिला आहे’, असे ट्विटमधून एच. डी. देवेगौडा यांनी नमूद केले आहे. ‘प्रज्ज्वल रेवन्नावरील आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्यास त्यांना कठोर शिक्षा करावी’, असे एच. डी. देवेगौडा म्हणाले.

‘प्रज्ज्वलच्या विदेश दौऱ्याबाबत माहित नाही’

माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी आपल्या नातवाला इशारा देत दोन पानांचे पत्र लिहिले आहे. ‘गेल्या काही आठवड्यांत लोकांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबाविरोधात सर्वात कठोर भाषा वापरली आहे. प्रज्ज्वलच्या हालचालींबाबत मला काहीच माहिती नव्हतं. पण हे मी लोकांना समजावूनही सांगू शकत नाही. मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही, हेही मी त्यांना पटवून देऊ शकत नाही. मला त्याच्या विदेश दौऱ्याबाबतही काहीच माहिती नाही. मी आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकण्यावर विश्वास ठेवतो. माझा परमेश्वरावर विश्वास आहे आणि देव सर्वकाही जाणून आहे. याची मला जाणीव आहे’, असे माजी पंतप्रधान देवोगौडा यांनी म्हटले आहे.

‘प्रज्वल रेवन्नाने पळून जाण्यासाठी राजनैतिक विशेषाधिकारांचा गैरवापर केला’; सिद्धरामय्यांचं पंतप्रधानांना आणखी एक पत्र

‘आजोबांबद्दल आदर असेल तर, प्रज्ज्वल परत ये’

जवळपास एक महिन्यापासून विदेशात पळून गेलेल्या प्रज्ज्वल रेवन्नाला एच. डी. देवेगौडा यांनी दरडावलं आहे. ‘मी फक्त एक काम करू शकतो. मी प्रज्ज्वलला कठोर इशारा देऊ शकतो. तो जिथे कुठे आहे, तिथून परत येऊन त्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली पाहिजे. मी हे कुठलं आवाहन करत नाहीये तर, इशारा देतोय’, असे एच. डी. देवेगौडा म्हणालेत.

प्रज्ज्वल रेवन्ना प्रकरण : माजी पंतप्रधान देवेगौडांनी हात झटकले