‘प्रज्वल रेवन्नाने पळून जाण्यासाठी राजनैतिक विशेषाधिकारांचा गैरवापर केला’; सिद्धरामय्यांचं पंतप्रधानांना आणखी एक पत्र

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक पत्र लिहून अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाचा सामना करणाऱ्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) खासदार प्रज्वल रेवन्ना यांचा राजनैतिक पासपोर्ट रद्द करण्याची विनंती केली.

आपल्या पत्रात सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएने कर्नाटकच्या हसन लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवलेला प्रज्वल रेवन्ना आपल्या राजनैतिक पासपोर्टचा वापर करून 27 एप्रिल रोजी जर्मनीला पळून गेला हे ‘लज्जास्पद’ आहे.

त्याच्या ‘घृणास्पद कृत्यांचे वृत्त समोर आल्यानंतर आणि त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल होण्याच्या काही तासांपूर्वीच तो देश सोडून पळून गेला’, असं त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्रातून सांगितलं.

‘देशातून पळून जाण्यासाठी आणि गुन्हेगारी कारवाईतून सुटण्यासाठी त्यानं आपल्या राजनैतिक विशेषाधिकारांचा गैरवापर केला आहे’, असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाला कर्नाटक सरकारकडून प्रज्वल रेवन्ना यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याबाबतचं पत्रही प्राप्त झालं आहे.

त्यांच्या विरोधात लूक आउट सर्कुलर आणि ब्लू कॉर्नर नोटीस जारी होऊनही प्रज्वल रेवन्ना आजपर्यंत लपून राहण्यात यशस्वी झाला, ही गंभीर चिंतेची बाब असल्याचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

‘परिस्थितीची गंभीरता माहित असूनही मी पाठवलेल्या मागील पत्रावर देखील कारवाई केली गेली नाही, हे गंभीर आहे’, असं ते म्हणाले. सिद्धरामय्या यांनी या महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींना असंच आवाहन केलं होतं

पंतप्रधान मोदींना ‘अत्यंत गांभीर्याने’ या प्रकरणाचा विचार करण्याचं आवाहन करून, त्यांनी रेवन्नाचा राजनैतिक पासपोर्ट रद्द करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याची विनंती केली.