देश विदेशातल्या बातम्या वाचा थोडक्यात…

महाराष्ट्रासह 18 राज्यात आज बँका बंद
उद्या, बुद्ध पोर्णिमेनिमित्त देशातील 18 राज्यात बँका बंद असणार आहेत. आरबीआयकडून खासगी आणि सरकारी बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र, मिझोराम, त्रिपुरा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीरसह अन्य काही राज्यात बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

उन्हामुळे शाहरुख रुग्णालयात
अभिनेता शाहरुख खानला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाहरुखला कडक उन्हामुळे डिहायड्रेशन झाले. अहमदाबाद येथील केडी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. 21 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) दरम्यान अहमदाबाद येथे आयपीएल 2024 ची पहिली क्वालिफायर मॅच झाली. यामध्ये शाहरुखच्या केकेआर टीमने बाजी मारून सलग चौथ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यासाठी शाहरुख दोन दिवस अहमदाबादमध्ये होता. उन्हामुळे त्याला त्रास झाला. प्राथमिक उपचारानंतर त्याला डिस्चार्ज मिळाला. त्याची प्रकृती आता ठीक आहे.

फ्लाइंग कार आली, एअर टॅक्सी येतेय
जपानच्या टोकियो येथे आंतरराष्ट्रीय टेक इव्हेंटमध्ये फ्लाइंग कार पहिल्यांदाच दिसली आहे. कोटो वॉर्डमधील टोकियो बिग साईट कन्व्हेन्शन सेंटरच्या बाहेर पार्ंकगमध्ये पायलटसह कारने 10 मीटरपर्यंत उड्डाण केले. ‘हेक्सा’ असे या कारचे नाव असून ही अमेरिकन कंपनी लिफ्ट एअरक्राफ्ट इंकने विकसित केली आहे. हेक्सा फ्लाइंग कार ही 4.5 मीटर रुंद, 2.6 मीटर उंच आणि अंदाजे 196 किलोग्रॅम वजनाची आहे. ही केवळ सिंगल सीट कार आहे. ही कार जमीन आणि पाणी, दोन्हीवर उतरू शकते. विदेशात फ्लाइंग कार दिसत असून हिंदुस्थानातही महिंद्रा आणि मारुती सुझुकीसह तीन कंपन्या इलेक्ट्रिक फ्लाइंग कार बनवत आहेत.

ह्युंदाईची इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी
ह्युंदाईच्या एअर मोबिलिटी कंपनी सुपरनलने कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (सीईएस) 2024 मध्ये इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सीचे अनावरण केले. ही फ्लाइंग कार 1500 फूट उंचीवरून ताशी 120 मैल वेगाने उड्डाण करू शकणार आहे. 2028 पर्यंत ही कार लाँच केली जाऊ शकते.

मारुती सुझुकीचीही फ्लाइंग कार
मारुती सुझुकी आपली मूळ कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशन (एसएमसी)च्या सहकार्याने उडणारी इलेक्ट्रिक कार बनवत आहे. कंपनीने यासाठी जपानी स्टार्टअप स्काय ड्राईव्हसोबत भागीदारी केली आहे.

महिंद्राही एअर टॅक्सी आणणार
ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रासुद्धा एअर टॅक्सी आणणार आहे. कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी नुकतीच एक्सवर यासंबंधी माहिती दिली होती. ही इलेक्ट्रिक एअर टॅक्सी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रासच्या पुढाकाराने ई-प्लेनमध्ये विकसित केली जाईल.

सोने-चांदी कडाडल्याने ‘कांचीपुरम’ साडी महागली
सोने आणि चांदीची जरी असलेल्या कांचीपुरम साडय़ा म्हणजे महिलांच्या जिव्हाळय़ाचा विषय. कांचीपुरम शहरातील या प्रसिद्ध सिल्क साडय़ांना जगभरात मागणी आहे. मागील आठ महिन्यांत कांचीपुरम साडय़ांच्या किमती 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत. याचे कारण म्हणजे सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ. ऑक्टोबर 2023 ते मे 2024 या कालावधीत साडय़ांच्या किमती 40 ते 50 टक्के वाढल्या. आता ग्राहकांनी सोने-चांदीचा वापर नसलेल्या साडय़ा खरेदी करायला सुरुवात केलीय. कांचीपुरममध्ये सिल्क साडी उद्योगाचे 10 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. कांचीपुरम सिल्क साडी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे के. व्ही. दामोदरन यांनी सांगितले.
रेशम, सोने आणि चांदीपासून बनवलेल्या कांचीपुरम सिल्क साडय़ा विशेष प्रसंगात, समारंभात वापरल्या जातात. जीआय टॅग असलेल्या या साडय़ांच्या प्रकारात कालानुरूप बदल झाले आहेत. त्यांच्या किमती 20 हजारांपासून अडीच लाखांपर्यंत असतात.

आंध्रातील जया बडिगा अमेरिकेत जज
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे राहणाऱया जया बडिगा यांची अमेरिकेतील पॅलिपहर्निया येथील न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. अमेरिकेत न्यायाधीश बनलेल्या त्या आंध्र प्रदेशातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांचे वडील रामकृष्ण बडिगा हे आंध्र प्रदेशातील माजी खासदार आणि प्रसिद्ध उद्योगपती आहेत. 2009 मध्ये जया यांनी पॅलिपहर्निया स्टेट बार परीक्षा यशस्वीपणे पार केली. सुमारे 10 वर्षे वकील म्हणून प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांची पॅलिपहर्निया येथे न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली आहे.

मेटा, गुगलचा चाईल्ड सेफ्टी विधेयकाला विरोध
न्यूयॉर्कमधील सभागृहात ‘स्टॉप एडिक्टिव फीड्स एक्स्प्लॉइटेशन (सेफ) फॉर किड्स अॅक्ट’ आणि ‘न्यूयॉर्क चाइल्ड डाटा प्रोटेक्शन अॅक्ट’ अशी दोन विधेयके सादर करण्यात आली आहेत. मात्र, टेक्नोलॉजी कंपनी गुगल आणि मेटा या दोन कंपन्यांनी सभागृहात सादर केलेल्या या दोन्ही विधेयकांना विरोध केला आहे. ही विधेयके न्यूयॉर्कच्या विधानसभेत पारित झाल्यास बालकांमधील इंटरनेट वापराला लगाम बसण्याची भीती गुगल आणि मेटाला वाटत आहे. या विधेयकांवर सभागृहात लवकरच मतदान होणार असून या विधेयकांच्या विरोधात सर्वाधिक मतदान होण्यासाठी मेटा, गुगल प्रयत्न करीत आहेत. या विधेयकांविरोधात सर्व आमदारांना एकवटण्यासाठी दोन्ही टेक कंपन्यांनी आतापर्यंत 6 कोटींहून अधिक रुपये खर्च केले आहेत.

चीनमधून लॅपटॉप, टॅबलेट आयातीत वाढ
चीनमधून लॅपटॉप, टॅबलेट आणि कॉम्प्युटरची आयात 47.1 टक्क्यांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. चीनमधून आयात करण्यात आलेली उत्पादने ही तब्बल 172.6 दशलक्ष डॉलरच्या किमतीची आहे. म्हणजेच हिंदुस्थानातून इतकी मोठी रक्कम चीनकडे गेली आहे. प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर उत्पादनांची आयात सुरू झाल्यानंतर पाच महिन्यांनंतर आयात वाढली आहे. मार्चमध्ये सिंगापूरमधून कॉम्प्युटरची आयात 63.9 टक्क्यांनी घसरून 12.2 दशलक्ष डॉलर झाली. परंतु हाँगकाँगमधील आयात 39.1 टक्क्यांनी वाढून 33.6 दशलक्ष डॉलर झाली.

ब्रिटनमधील विद्यार्थ्यांना महागाईचा फटका
ब्रिटनमध्ये वाढलेल्या महागाईचा फटका तेथे शिक्षण घेत असलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना बसला आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱया विद्यार्थ्यांच्या राहणीमानाचा खर्च 25 टक्क्यांनी वाढल्याने विद्यार्थ्यांच्या वार्षिक खर्चात पाच लाखांची वाढ झाली आहे. ब्रिटनमध्ये शिकणाऱया जवळपास दोन लाख हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना आता 15 लाखांऐवजी वार्षिक 20 लाख रुपये खर्च करावे लागत आहेत. विद्यार्थी व्हिसासाठी आधी किमान शिल्लक 10 लाख 5 हजार रक्कम होती. आता ती 11 लाख 70 हजार होणार आहे.

नायजेरियात अंदाधुंद गोळीबारात 40 ठार
आफ्रिकेतील नायजेरियातील एका गावात बंदूकधाऱयांनी केलेल्या अंदाधुंद केलेल्या गोळीबारात 40 लोक ठार झाले. आरोपींनी गावातील अनेक घरांना आग लावली. तसेच अनेकांचे अपहरणही केले. या ठिकाणी शेतकरी आणि मेंढपाळ यांच्यात वारंवार हिंसाचार होतो. सुरक्षा दल आणि हल्लेखोर यांच्या जोरदार धुमश्चक्री उडाली. यात सुरक्षा दलाच्या हल्ल्यात सात हल्लेखोर ठार झाले. डझनभर बंदूकधारी मोटरसायकलवरून गावात घुसले आणि त्यांनी लोकांवर गोळीबार केल्याचे गावकऱयांचे म्हणणे आहे. हल्लेखोरांनी धुमाकूळ घातला.

रशियाकडून युव्रेनमध्ये अण्वस्त्र चाचणी
रशिया आणि युव्रेन यांच्यातील युद्ध थांबायचे नाव घेत नाही. गेल्या दोन वर्षापासून या दोन देशात युद्ध सुरू आहे. रशियन लष्कराने युव्रेनच्या इस्कंदर आणि किंजल क्षेपणास्त्र यांसह सामरिक अणुचाचण्या सुरू केल्या आहेत. या चाचण्या नेमक्या कोणत्या ठिकाणी केल्या जात आहेत हे रशियाने सांगितलेले नाही. रशियाने युद्धाच्या सुरुवातीच्या काळात हा भाग ताब्यात घेतला होता. नाटो आणि पाश्चात्य देशांनी युव्रेनच्या मदतीसाठी सैन्य पाठवण्याची चर्चा केली असतानाच रशिया ही चाचणी करत आहे.