अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाने जामीन केला मंजूर

मध्य प्रदेशातील एका प्रकरणावर उच्च न्यायालयाने अनोखा निर्णय दिला आहे. एका प्रकरणात मध्य प्रदेशातील अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा छळ केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने एका विद्यार्थ्याला जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने मुलाची ‘चांगली कौटुंबिक पार्श्वभूमी’ नमूद करत त्याला एक संधी दिली आहे. शिवाय दोन महिने भोपाळ रुग्णालयात लोकांची सेवा करण्याची अट घालत जामीन मंजूर केला आहे.

न्यायमूर्ती आनंद पाठक यांनी या प्रकरणावर 16 मे रोजी सुनावणी केली. ते म्हणाले की, दिलेल्या आपल्या आदेशात असे निरीक्षण नोंदवले की, POCSO अंतर्गत दाखल करण्यात आलेले आरोप निरर्थक आहेत, परंतु आरोपींना आपले मार्ग सुधारण्याची संधी दिली पाहिजे. या मुलाला पोलिसांनी 4 एप्रिल रोजी अटक केली होती. त्याच्यावर अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला फोन करून त्रास दिल्याचा आरोप होता.

न्यायालयाने आरोपी विद्यार्थ्याला भोपाळ जिल्हा रुग्णालयात प्रत्येक शनिवार आणि रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 1 वाजपर्यंत सेवा करण्याचे आदेश दिले आहेत. तो डॉक्टर आणि कंपाऊंडर्सना मदत करेल आणि रुग्णांची काळजी घेईल, अशी अट घालण्यात आली आहे. बराच काळ तुरुंगात राहिल्याने त्याच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचा युक्तिवाद आरोपीने उच्च न्यायालयात केला होता.

मुलाचे वकीलाने न्यायालयाला सांगितले की, त्याला शिक्षा मिळाली आहे आणि यापुढे तो असे काही करणार नाही. त्याच्या शिक्षणासाठी आणि उत्तम संगोपनासाठी त्याला आता जामीन मिळायला हवा. आरोपीचे आई-वडिलही न्यायालयात पोहोचले आणि सांगितले की, त्यांच्या मुलाने जे कृत्य केले ते लाजिरवाणे आहे. त्यांनी तो असे कृत्य पुन्हा करणार नाही अशी त्यांनी हमी दिली. आरोपीच्या वकिलाने कोर्टाला सुचवले की, तो सुटल्यावर त्याने समाजसेवा किंवा अन्य काही रचनात्मक काम करावे. न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आणि सांगितले की, त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा खाजगी वॉर्डमध्ये जाऊ दिले जाणार नाही, तसेच रुग्णांना कोणत्याही प्रकारचे औषध किंवा इंजेक्शन इत्यादी देण्याची परवानगी दिली जाणार नाही. पण तो रूग्णालयातील रूग्णांची सेवा करेल.