विराट कोहलीच्या जिवाला धोका? चार संशयित अतिरेक्यांना अटक

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या एलिमिनेटर लढतीच्या पूर्वसंध्येला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सुरक्षेच्या कारणामुळे अचानक सराव सत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर बंगळुरूने पत्रकार परिषदही रद्द केली. स्टार खेळाडू विराट कोहलीसह इतर खेळाडूंच्या सुरक्षेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाल्याने बंगळुरूने सरावाबरोबरच पत्रकार परिषददेखील रद्द केली.

बंगळुरूने कोणतेही अधिकृत कारण न देता सराव सत्र रद्द केले. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचे खेळाडू सराव सत्रात सहभागी झाले होते. मंगळवारी आयपीएलमधील क्वॉलिफायर-1 लढत नरेंद्र मोदी स्टेडियमवर चालू एलिमिनेटर लढतीत बंगळुरू व राजस्थान या दोन्ही संघांना गुजरात कॉलेजचं मैदान पर्याय म्हणून दिलेलं होतं. गुजरात पोलिसांच्या अधिकाऱयांचा दाखला देत बंगाली भाषेतील दैनिक ‘आनंद बझार पत्रिका’ या वृत्तपत्राने विराट कोहलीच्या सुरक्षेला धोका असल्याच्या कारणावरून पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याचा दावा केला आहे.

अहमदाबाद विमानतळावर चार संशयितांना अटक

गुजरात पोलिसांनी अहमदाबादच्या विमानतळावर सोमवारी रात्री चार जणांना दहशतवादी कारवायांच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. पोलिसांना त्यांच्याकडून शस्त्र, काही व्हिडीओ आणि टेक्स्ट मेसेज मिळाले होते. यासंदर्भातील माहिती दोन्ही संघांना देण्यात आली होती. राजस्थान रॉयल्सने सराव सत्रात भाग घेतला. दुसरीकडे बंगळुरूने सराव सत्र आणि पत्रकार परिषद रद्द केली. हे करताना कोणतेही कारण अधिकृतपणे सांगण्यात आले नव्हते. राजस्थान आणि बंगळुरू हे दोन्ही संघ सोमवारीच अहमदाबादमध्ये पोहोचले होते. पोलीस अधिकारी विजयसिंघ ज्वाला म्हणाले, कोहलीसह त्याच्या संघाला आम्ही हे सर्व कळवले होते. राजस्थानलादेखील याबाबत माहिती देण्यात आली होती.

गुजरात क्रिकेट असोसिएशनची सारवासारव

विराट कोहली किंवा त्याच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला कोणताही दहशतवादी धोका नव्हता, अशी सारवासारव आता गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी केली आहे. ते म्हणाले, गुजरात कॉलेजच्या मैदानावर आम्ही राजस्थान रॉयल्स आणि बंगळुरू या दोन्ही संघांसाठी सरावाची व्यवस्था केली होती. बंगळुरूला दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत सराव करायचा होता, मात्र उष्णतेमुळे त्यांनी सराव सत्र रद्द केले. आम्ही बंगळुरूला सांगितले की, ते तेथील इनडोअर सराव सुविधा किंवा नरेंद्र मोदी स्टेडियममधील इनडोअर सुविधा वापरू शकतात, मात्र उष्णतेच्या लाटेमुळे बंगळुरूने सराव न करण्याचा निर्णय घेतला.’