Lok Sabha Election 2024 : ‘इंडिया’ आघाडी किती जागा जिंकेल? दिल्लीतील मतदानाआधी अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी येत्या 25 मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात सहा राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेश मिळून एकूण 58 मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये दिल्लीतील सर्व 7 लोकसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. तसेच बिहार, हरयाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील मतदारसंघांमध्येही मतदान होणार आहे. सहाव्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघडीला किती जागा मिळणार? याचे भाकित अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतून अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. आम आदमी पार्टी वेगाने वाढत असल्याने नरेंद्र मोदी आणि भाजप घाबरले आहेत. आमच्यावर सतत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र, आम्ही सत्याच्या बाजूने उभे आहोत आणि लढत राहणार आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

‘दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची लाट’

दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची लाट आहे, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. दिल्लीतील लोकसभेच्या सर्व सातही जागांवर ‘इंडिया’ आघाडीचा विजय व्हायला हवा, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित आहे. ‘इंडिया’ आघाडीला निवडणुकीत 300 हून अधिक जागा मिळतील. आणि बहुमताने ‘इंडिया’ आघाडीचे सरकार सत्तेत येईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला.