ताडोबात बुद्ध पौर्णिमेला ‘निसर्ग अनुभव, 250 निसर्गप्रेमींचा 90 मचणांवर मुक्काम

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ‘बफर झोन’मध्ये आज गुरुवारी बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लख्ख प्रकाशात 90 मचाणांवरून प्राणी गणना केली जाणार आहे. ‘निसर्ग अनुभव’ या गोंडस नावाने दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. एका मचाणवर दोन निसर्गप्रेमींना साडेचार हजार रुपये शुल्क आकारून रात्रभर मुक्कामाची संधी दिली जाते. निसर्ग अनुभवासाठी निसर्गप्रेमींकडून या सर्व मचाणांची नोंदणी पूर्ण झालेली आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लख्ख प्रकाशात प्राणीगणना केली जाते. यावर्षी प्रथमच ‘कोअर झोन’ वगळता ‘बफर’ क्षेत्रातील चंद्रपूर, मूल, मोहर्ली, खडसंगी, पळसगाव व शिवणी या सहा परिक्षेत्रातील मचाणांवर प्राणीगणना अर्थात निसर्ग अनुभव हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी ताडोबा बफर क्षेत्रातील 90 मचाणांवर प्रत्येकी दोन निसर्गप्रेमींना संधी देण्यात आली आहे. आठवडाभरापूर्वीच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने ‘माय ताडोबा’ या संकेतस्थळावर निसर्ग अनुभव उपक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. 90 मचाणांवर प्रत्येकी दोन, अशा 250 निसर्गप्रेमींनी यासाठी नोंदणी केली. यासाठी साडेचार हजार रुपये शुल्क आकारण्यात आले. तसेच प्रत्येक मचाणवर दोन निसर्गप्रेमींसोबत एक मार्गदर्शक (गाईड) असेल. बुद्ध पौर्णिमेला म्हणजे आज गुरुवारी सायंकाळी चार वाजता प्रत्येक प्रवेशद्वारावर या निसर्गप्रेमींना बोलावण्यात आले आहे. तिथून या निसर्गप्रेमींना वाहनाद्वारे (जिप्सी) मचाणापर्यंत नेले जाईल. निसर्गप्रेमींना जेवण, पाणी, चादर आणि आवश्यक वस्तू सोबत आणावे लागणार आहे.

एकदा मचाणावर चढल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळीच खाली उतरता येईल. त्यामुळे निसर्गप्रेमींना सर्व तयारीनिशी बोलावण्यात आले आहे. पान, खर्रा, विडी, तंबाखू, तसेच पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या सोबत आणण्यास मनाई आहे. या सर्वांकडून नोंदणी करतानाच त्यांचे ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रे घेण्यात आलेली आहेत. प्रगणना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी या सर्वांना संबंधित प्रवेशद्वारावर सोडण्यात येणार आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही निसर्ग अनुभव घेण्यासाठी निसर्गप्रेमींमध्ये उत्साह दिसून येतो आहे. या सर्वांना ताडोबा प्रकल्पाच्यावतीने आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सर्व सूचनांचे पालन करावे, असे निर्देश आहेत. बुद्ध पौर्णिमेच्या या निसर्ग अनुभव उपक्रमासाठी ताडोबा बफर क्षेत्रातील सर्व मचाण दुरुस्ती करून सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.