लेख – जगाला बुद्ध विचारांची गरज

>> प्रा. सचिन बादल जाधव

बुद्ध विचार असा आहे की, वैराने वैर कधीच शांत होत नाही. अवैराने वैर शांत होते. युद्धाने युद्ध कधीच शांत होत नाही, तर शांतीनेच युद्ध शांत होते. तर जगात जे थैमान सुरू आहे, त्यांना बुद्ध विचारच तारणारा आहे. बुद्ध विचार हा विश्व, बंधुत्व, समता, न्याय, करुणेचा संदेश देतो. मानवाच्या दुःखमुक्तीचा विचार तथागत भगवान बुद्ध जगाला सांगतात. त्यामुळे बुद्ध विचाराशिवाय जगाला पर्याय नाही… आजच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त

बौद्ध धर्म हा पुरातन आणि विज्ञानावर आधारित मानवता शिकविणारा धर्म आहे. त्याचे आचरण आणि विचारधारा तितक्याच पवित्र पद्धतीने समाजात रुजविणे गरजेचे असून हे काम उपासकांना करावे लागणार आहे. अखिल मानवतेला शांती आणि सद्विचारांची गरज असून बुद्धांचा विचारच जगाला तारणार आहे. गौतम बुद्धांच्या विचारांची जगाला अत्यंत गरज आहे. मग ते विचार कोणते व कोणत्या स्वरूपात गरज आहे ते खाली बघू या.

चार आर्यसत्य – बुद्धांनी चार आर्यसत्य जगाला सांगितले आहेत. ज्यामुळे जगात खूप मोठे प्रवर्तन होईल.

दुःख – हे स्थूल जीवन दुःखमय आहे, हे सर्वांना माहीत आहे, पण ते दुःख कोणत्या स्वरूपात आहे यावर कोणीही विचार करत नाही. एकमेकांना त्रास देऊन आपण ज्या सुखाची प्राप्ती करण्याची इच्छा करत आहात, मुळात सुख हे या तलावर या प्रकारे मिळणारच नाही. कितीही सावधगिरी बागळली तरी जन्म, मृत्यू, जरा, व्याधीपासून कोणी वाचून राहिले आहे का ? तरीही एवढा अट्टाहास कशाला ?

तृष्णा – इच्छांचे भरण आयुष्यात कधीही होत नसते हे सर्वांना माहीत आहे, पण तरीही स्वतःच्या इच्छेप्रमाणे सर्व व्हावे यासाठी इतरांची मानसिक व शारीरिक हिंसा करणे आजच्या जगाने सोडले पाहिजे. स्वतःच्या इच्छा कधीही पूर्ण होत नसतात. मग कशाला एक-एक करून त्यांच्या पूर्णतेसाठी वेळ वाया घालवावा ?

दुःखाचे निवारण – सर्वांना माहीत आहे की, जीवनात दुःख असते व इच्छा कधीही पूर्ण होणाऱया नसतात. तरीही खूप सारे यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करत नाहीत. (पाकदेखील सज्ञान आहे की, भारत किती बलशाली आहे, परंतु त्यांना त्यांच्याच कृत्यांमुळे मिळणाऱया दुःखाचे निवारण करणे जमत नाही.)

अष्टांगिक मार्ग – हे अष्टांगिक मार्ग सर्वांना माहीत आहेत, पण त्यांचे पालन कोण करेल ? बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गात आठ सम्यक मार्ग सांगितले आहेत, पण त्यांचे तंतोतंत पालन जर संपूर्ण जग करू लागले तर जग सदाचारी होईल. मग ते सर्वांच्या स्वप्नातील सत्ययुग या कलियुगात अवतरेल यात तिळमात्र शंका नाही.

चार आर्यसत्य झाले. हे सर्व श्रुत व सर्व जणांना ज्ञात आहेत, पण मात्र माहीत असूनसुद्धा त्यांचे पालन करणे अनेकांना जमत नाही. बुद्धांनी सांगितलेले आठ उपाय म्हणजेच अष्टांगिक मार्ग जगावर कसा परिणाम करतील ते बघू या.

सम्यक वाचा – जगाने एकमेकांशी बोलताना आपल्या वाणीला शुद्ध व चांगले बनवले तर जगात सर्व प्रकारचे तंटे, भांडण व युद्धे कायमची थांबतील. एकमेकांची निंदा, द्वेष याच वाणीने प्रकट होत असतात. त्यामुळे आपली वाचा सुद्ध ठेवावी असा उपदेश बुद्धांनी या मार्गात केलेला आहे.

सम्यक कर्मांत – चांगली कामे करणे, सत्कृत्य करणे आणि जेव्हा जग या मार्गाचे अनुसरण करायला लागेल तेव्हा जगात कुठेही चोरी, लूट, बलात्कार, हत्या, गुन्हेगारी होणार नाही. सर्व प्रकारची वाईट कृत्ये थांबतील. त्यामुळे मानवाचे जीवन सुखी होईल. सर्वजण चांगली कृत्ये करू लागल्यामुळे जीवन जगणे सोपे होईल.

सम्यक संकल्प – चांगला संकल्प करू या की, जगात माझ्यामुळे इतरांना व देशाला त्रास होणार नाही. हा संकल्प आपल्या घरापासून प्रत्येकाने सुरू केल्यास देश सुंदर व स्वच्छ होतील. जर कोणी असा संकल्प केला की, मी दिवसातून फक्त दोन तास सेवावस्तीवर जाऊन गरीब मुलांना शिकवेल तर तो माणूस दोन पिढय़ा घडवेल. असा संकल्प जरी हजारातून दोन जणांनी केला तरी जगातून निरक्षरता कायमस्वरूपी नष्ट होईल.

सम्यक अजीविका – पुन्हा तेच बुद्ध सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, मी आपली उपजीविका चांगल्या मार्गाने कमवीन. चोरी, लूट, खोटय़ा पद्धतीने कोणीही उपजीविका करणार नाही आणि म्हणूनच या पद्धतीने जर जगाने हा मार्ग स्वीकारला तर नेते, पुढारीपासून तर दुधात भेसळ करणारा सामान्य दूधवाल्यापर्यंत सर्वजण जगाला उच्चतम मार्गावर नेतील. सदाचार आपोआपच जगात वाढायला लागेल, जेव्हा हा मार्ग लोक स्वीकारतील.

सम्यक स्मृती – स्मृती म्हणजे काय तर मनातली साठलेली माहिती, विचार. या सर्व विचारांना चांगले बनवले तर जीवनातील दुःखाचा अंत होईल. इतरांविषयी चांगली भावना व विचार ठेवणे, एकात्मतेचा भाव जपणे असा हा मार्ग सांगतो.

सम्यक व्यायाम – येथे व्यायामाचा अर्थ शरीरसौष्ठव करणे असा नसून चांगल्या कामांसाठी तत्पर असणे असा आहे. वाईट विचारांचा नाश करून सदाचारी बनण्याची प्रक्रिया करणे म्हणजे सम्यक व्यायाम असा अर्थ घ्यावा. जगाने या मार्गाचा अवलंब केल्यास तुम्हीच सांगा, जग किती दुराचारीपासून सदाचारी होईल. जगात चांगली कृत्ये घडू लागतील.

सम्यक दृष्टी – इतरांकडे आपुलकीने बघणे, वाईटाकडे चांगल्या नजरेने बघणे, नकारात्मकता सोडून सकारात्मक भावनेने बघणे, अशा प्रकारे जर जग वागू लागले तर इसिससारख्या कुख्यात क्रूर लोकदेखील शांत व निर्मळ बनतील.

सम्यक समाधी – समाधी म्हणजे जीवनाचा अंत, तर तडपून, रोगाने, व्याधीने त्रस्त होऊन खितपत मरण्यापेक्षा सत्कर्मे करून सुख-दुःखाच्या बंधनातून जगाने मुक्तता करून घेतली तर जगातील दुःखाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही.