लाखो आदिवासी बांधवांनी केले जागजई येथे वैशाखस्नान व देवदर्शन

विदर्भातील तमाम आदिवासी समाजाचे पंढरपूर असलेल्या राळेगाव तालुक्यातील जागजई येथे दरवर्षी वैशाख- पोर्णिमा या तिथीवर आदिवासी बांधव हे यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, नागपुर जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने येथील पवित्र वैशाख स्नान करण्याकरीता व देवदर्शन घेण्याकरिता येत असतात. आज गुरुवार दि 23मे ला विदर्भातील लाखों आदिवासी समाज बांधव वैशाखस्नान व देवदर्शन घेण्यासाठी जागजई येथे आले होते.जागजई हे आदिवासींची पंढरी आणि काशी म्हणून ओळखले जाते. वर्धा आणि यशोदा नदीच्या संगमावर हे क्षेत्र वसले आहे. वैशाख पौर्णिमेला भल्या पहाटे भाविक या देवांच्या मूर्त्यांच्या मागे वाजत-गाजत सहभागी होऊन स्नान करतात. ठिकठिकाणचे आदिवासी बांधव आपल्या

गावातील देवांची पूजा- अर्चना आटोपून या ठिकाणच्या वर्धा नदीच्या पंचधारात स्नानाकरिता दाखल होत असतात. आपल्या समाजाची उन्नती व्हावी याकरिता आदिवासी बांधव हे येथे प्रार्थना करतात .तापत्या उन्हातही वैशाख महिन्यात येथे मोठी अशी जत्रा भरते

मात्र हे क्षेत्र अद्याप मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पेरसापेन, भिमालपेन, रान, मानको, तोडोबा, कल्यासूर आदी अनेक देवतांच्या स्नानाचा वैशाख पौर्णिमा हा पवित्र दिवस आहे. त्यामुळे लाखो आदिवासी बांधव या ठिकाणीच्या पवित्र स्नानास येतात. विशेषतः यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील 50 ते 60 हजार आदिवासी भाविक दरवर्षी हजेरी लावतात. त्यामुळे जागजई हे आदिवासींची पंढरी आणि काशी म्हणून ओळखली जाते .

जाग जाई क्षेत्र हे मूलभूत सुविधांपासून वंचित आहे . जागजई येथे अंतरगाव येथून जावे लागते. मात्र हा सात किलोमीटरचा रस्त्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. रस्त्यावर केवळ खड्डे दिसतात. गावातून संगमापर्यंत पायऱ्या नाहीत. डोहानजिक पुरेशा सुविधा नाही. परिणामी काही वर्षांपूर्वी दोन भाविकांचा डोहात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे तेथे बचावात्मक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या क्षेत्राला तीर्थक्षेत्र अथवा पर्यटन क्षेत्र म्हणून मान्यता देण्याची मागणी आहे.त्यानुसार किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते माजी शालेय शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी केली आहे .