पंतप्रधान नरेंद्र मोदी बलात्काऱ्याला का वाचवताहेत? प्रज्ज्वल रेवन्नावरून राहुल गांधीचा प्रश्न

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा पत्र लिहून बलात्काराचा आरोपी असलेल्या प्रज्ज्वल रेवन्नाचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्याकडे ही मागणी केली होती. याच पोस्टवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक प्रश्न आता पंतप्रधानांना विचारला आहे. इतक्या महिलांवर बलात्कार करणाऱ्याला तुम्ही का वाचवत आहात? असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमधील धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (JDS) खासदार आणि लोकसभा निवडणुकीतील हासन मतदारसंघाचे उमेदवार प्रज्ज्वल रेवन्ना याचे सेक्स स्कँडल समोर आल्याने एकच खळबळ उडाली. हे प्रकरण उघड होताच प्रज्ज्वल रेवन्ना विदेशात पळून गेला. त्यानंतर सिद्धरामय्या यांनी पंतप्रधानांना पत्रात सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएने कर्नाटकच्या हसन लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवलेला प्रज्वल रेवन्ना आपल्या राजनैतिक पासपोर्टचा वापर करून 27 एप्रिल रोजी जर्मनीला पळून गेला हे ‘लज्जास्पद’ आहे.

त्याच्या ‘घृणास्पद कृत्यांचे वृत्त समोर आल्यानंतर आणि त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल होण्याच्या काही तासांपूर्वीच तो देश सोडून पळून गेला’, असं त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्रातून सांगितलं. ‘देशातून पळून जाण्यासाठी आणि गुन्हेगारी कारवाईतून सुटण्यासाठी त्यानं आपल्या राजनैतिक विशेषाधिकारांचा गैरवापर केला आहे’, असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे.