50 हजार कोटींचा ‘गेल’ प्रकल्पही गेला! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा बॉम्बगोळा

राज्य सरकारच्या मुर्दाडपणामुळे महाराष्ट्रावर पुन्हा दरोडा पडला आहे. राज्यात 50 हजार कोटींची गुंतवणूक घेऊन येत असलेला ‘गेल’चा प्रकल्प मध्य प्रदेशात गेला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर किंवा कोकणातील दाभोळ येथे येणारा हा प्रकल्प मध्य प्रदेशातील सिहोर येथे उभारण्यात येणार आहे. एवढी मोठी गुंतवणूक राज्यातून बाहेर गेलीच कशी याचे उत्तर मिंध्यांनी द्यावे असा बॉम्बगोळा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टाकला आहे.

राज्यात मिंध्यांचे सरकार आल्यापासून उद्योग क्षेत्राला नजरच लागली आहे. तब्बल एक लाख कोटींची गुंतवणूक असलेला वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातने पळवला. त्यापाठोपाठ एअरबस टाटा, ड्रग बल्क पार्क आदी प्रकल्पही गुजरातला गेले. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर उद्योग गुजरातला पळवले जात असताना मिंधे सरकार हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसले होते. आता गॅस अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचा राज्यात येऊ घातलेला 50 हजार कोटींचा प्रकल्प मध्य प्रदेशातील सिहोर येथे गेला असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. सरकारी गॅस कंपनीकडून करण्यात येणारी आतापर्यंतची ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. या प्रकल्पात दरवर्षी 1.5 दशलक्ष टन इथेन क्रॅकिंग करण्यात येणार आहे. पेट्रोलियम पदार्थांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पाची मदत होणार आहे.

अंबादास दानवे यांनी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर हा गौप्यस्फोट केला असून, मिंधे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. महाराष्ट्रात येण्यासाठी हा प्रकल्प उत्सूक होता. त्यासाठी त्यांनी तयारीही चालवली होती. मग अचानक असे काय घडले की महाराष्ट्राच्या वाटेवर असलेल्या या प्रकल्पाने मध्य प्रदेशातील सिहोरची वाट धरली. महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा रोजगार असा सहजरीत्या बाहेर कसा काय गेला, याचे उत्तर मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांनी द्यावे, असे आव्हान दानवे यांनी दिले आहे.

मिंधे सरकार, उत्तर द्या
‘गेल’ने प्रकल्पाच्या जागेसाठी विचारणा केली होती का?
‘गेल’ने महाराष्ट्रात प्रकल्प उभारण्याचे का नाकारले?
‘गेल’सरकारी कंपनी आहे, मध्य प्रदेशात हा प्रकल्प नेण्यासाठी केंद्राने दबाव टाकला का?
अंबादास दानवे यांनी हे तीन प्रश्न मिंधे सरकारला विचारले असून, महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे, असे ठणकावले आहे.

डॉ. कराडांचे प्रयत्न अपयशी
गॅस अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकार्‍यांनी छत्रपती संभाजीनगरात होणार्‍या शेंद्रा-बिडकीन पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये प्रकल्पासाठी जागेची पाहणी केली होती. त्यानंतर ‘गेल’ तसेच उद्योग खात्याच्या उच्चपदस्थांशी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी तब्बल 12 बैठका केल्या. प्रकल्प येण्याच्या तयारीत असतानाच अचानक मध्य प्रदेशातील सिहोरकडे गेला. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गेल्याबद्दल डॉ. कराड यांनी चकार शब्दही काढलेला नाही, हे विशेष!