नगरमध्ये अनधिकृत होर्डिंग्जविरोधात सोमवारपासून महापालिका करणार कारवाई

नगर शहर व उपनगर परिसरात महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात 384 परवानाधारक होर्डिंग्जसह तब्बल 83 अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले आहेत. तसेच, 44 होर्डिंग्जचा परवाना संपुष्टात आलेला आहे. या सर्व होर्डिंग्ज मालकांना तत्काळ नोटीसा बजावण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. येत्या सोमवारपासून अनधिकृत होर्डिंग्ज उतरवण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी दिली.

मुंबई येथील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग्जचा सर्वे करण्याचे आदेश दिले होते. अतिरिक्त आयुक्त जोशी यांच्यावर ही जबाबदारी सोपवून सर्वेक्षणासाठी चारही प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीत उपायुक्तांच्या नियंत्रणाखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने बुधवारी अहवाल सादर केल्यावर अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी आढावा घेतला. सावेडी प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत 38, माळीवाडा (शहर) कार्यालयाच्या हद्दीत 15, झेंडीगेट 21 व बुरुडगाव कार्यालयाच्या हद्दीत 9 असे 83 अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले. तसेच, परवाना संपुष्टात आलेले 44 होर्डिंग्ज असल्याचे तपासणीत समोर आले आहे. या सर्वांना तत्काळ होर्डिंग्ज काढून घेण्याच्या नोटीसा बजावण्यात याव्यात. सोमवारपासून प्रत्यक्ष कारवाई सुरू करावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी दिले आहेत.

दरम्यान, शहरात परवाने देण्यात आलेल्या 384 होर्डिंग्जचीही तपासणी केली जाणार आहे. होर्डिंग्जला परवानगी देताना शासनाने निश्चित केलेल्या नियमांचे पालन केले आहे का, परवानगीनुसार त्याच आकाराचे होर्डिंग्ज आहे की मोठे आहे, होर्डिंग्ज योग्य पद्धतीने शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार उभारले आहेत का, इमारतीवर होर्डिंग्ज असल्यास त्या इमारतीचे व ज्यावर होर्डिंग्ज उभारले आहे, त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे का, आदी विविध मुद्द्यांवर येत्या आठ दिवसांत तपासणी केली जाणार असल्याचेही अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी सांगितले.