मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत मोठी अपडेट, जिल्हाधिकाऱ्यांच्या ठेकेदारांना कडक सूचना

मुंबई-गोवा महामार्गाच्या बाजूला असणारे मातीचे ढिगारे, रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दुरुस्थी, साईड पट्टीची कामे अशी अनेक महत्त्वाची कामे पावासाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणे गरजेची आहेत. याच अनुंषगाने जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी पाहणी केली व सर्व कामे गतीने करण्याच्या कडक सूचना ठेकेदारांना दिल्या.

पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज (23-05-2024) सकाळी दूरदृश्यप्रणालीद्वारे सर्व विभागांची मान्सुनपूर्व आढावा बैठक घेतली. पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी सिंह यांनी तात्काळ पाहणी दौरा केला. या दौऱ्यामध्ये मारुती मंदीर परिसरात असणाऱ्या चौकातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पार्किंग, स्टॉपिंग पट्टी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच रस्त्याच्या बाजूला डांबरीकरणाचा थर देण्याच्या सूचना सुद्धा करण्यात आल्या. याचबरोबर साळवी स्टॉप येथे चौपदरीकरणाची पाहणी करण्यात आली. कुवारबाव आणि हातखंबा येथील रस्त्याच्या कामांची पाहणी करुन दिशादर्शक फलक आणि रम्बलर लावण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांना केली. पावसाळ्यामध्ये माती वाहून रस्त्यावर येतो आणि चिखल झाल्यामुळे अपघातांची शक्यता निर्माण होते. याच अनुषंगाने मातीचे ढीगारे वाहून चिखल होणार नाही, याची दक्षता घेऊन ते बाजूला करावेत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदारांना दिल्या.

“रस्त्यावर पडलेले खड्डे भरुन घ्यावेत. रस्त्याची दुरुस्ती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदारांनी 1 जून पूर्वी करावी. ख्वाजा जमेरीनगर भागातील रस्त्याच्या बाजूला पडलेल्या कचरा निर्मुलनाचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करावे, ” असे जल्हाधिकारी सिंह हातखंबा-पाली रस्त्याची पाहणी केल्यानंतर म्हणाले.

“पोलीस यंत्रणांच्या माध्यमातून रबर बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर पूर्व सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाचे अथवा भरतीचे अलर्ट असताना नागरिकांनी सतर्क राहून आपली आणि इतरांची काळजी घ्यावी. तसेच प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन पोलीस अधिक्षक कुलकर्णी यांनी केले.

“मान्सूनच्या अनुषंगाने सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी अशी सूचना देण्यात आली आहे की, विद्यार्थी, लहान मुलांची काळजी म्हणून धोकादायक साकव बंद करण्याची सूचना देण्यात आली आहे. आरोग्य विभागालाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे मुख्य कार्यकारी अधिकारी पुजारी म्हणाले.

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या सोबतीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी चौपदरीकरण रस्त्याच्या कामाबरोबरच दुरुस्ती, साईड पट्टी, कचरा, रस्त्याच्या कडेला असणारा मातीचा ढिगारा, वाहतुकीला होणाऱ्या अडचणींबाबत पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत राहूल देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर उपस्थित होते.