कार्यालयीन कामकाजात केला हलगर्जीपणा, सांडव्याचा ग्रामसेवक निलंबित

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत नगर तालुक्यातील सांडवे येथील ग्रामसेवक नितीन शेषराव गिरी यांना निलंबित करण्यात आले आहे. 16 मे रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी हा निलंबनाचा आदेश काढला आहे.

नितीन गिरी यांची नेमणूक सांडवा येथे होती. तेथे कार्यरत असताना त्यांनी कार्यालयीन कामकाजात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केला. त्यांना पुरेशी संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. जि. प. कर्मचाऱ्याने सदैव निरपराध, सचोटीने वागणे व कर्तव्यपरायण असणे आवश्यक आहे. तथापि गिरी यांनी गैरवर्तन करून महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम 1967 चा नियम 3 चा भंग केला आहे. त्यामुळे त्यांना निलंबित केल्याचे आदेशात म्हटले आहे.

निलंबन काळात गिरी यांचे मुख्यालय कोपरगाव पंचायत समिती असेल. तसेच त्यांना कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.