
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ‘द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’च्या निवडणुकीचा वाद पुन्हा एकदा हायकोर्टात पोहोचला आहे. सोसायटीच्या आगामी निवडणुकीत मतदार यादीतून सरसकट वगळण्यात आल्याचा आरोप करत विवेक मोंटेरिओ व अन्य सदस्यांनी याप्रकरणी हायकोर्टात दाद मागितली आहे.
या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी देत सुनावणी तहकूब केली. विवेक मोंटेरिओ व इतर सात जणांनी धर्मादाय आयुक्तांच्या 13-14 मार्चच्या आदेशाला आव्हान दिले आहे. या आदेशानुसार सोसायटीच्या 14 मार्च रोजी होणाऱया व्यवस्थापन समितीच्या निवडणुका थांबवण्यात आल्या, व्यवस्थापन आणि छाननी समित्या बरखास्त करण्यात आल्या तसेच ट्रस्ट चालवण्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली. मात्र धर्मादाय आयुक्तांनी या 220 वर्षे जुन्या संस्थेतील निवडणुका बेकायदेशीरपणे थांबवल्या असून त्यातून आपल्याला वगळल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. या याचिकेवर आज सोमवारी न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली तेव्हा याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने ही परवानगी देत याचिकेवर एक आठवडय़ानंतर सुनावणी ठेवली. दरम्यान एशियाटिक सोसायटीची निवडणूक 4 जुलै रोजी होणार आहे.




























































