भुवीला का खेळवले ते शास्त्रींना विचारा – बीसीसीआय

सामना ऑनलाईन | नवी दिल्ली

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला इंग्लंडकिरुद्धच्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यासाठी हिंदुस्थानी संघात स्थान मिळाले नाही. मग तंदुरुस्त नसतानाही भुवनेश्वरला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात का खेळविण्यात आले, असा सवाल जेव्हा विचारला गेला, तेव्हा ते संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना विचारा, अशी संतप्त प्रतिक्रिया ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱयाने दिली.

तिसऱ्या लढतीपूर्वी एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत होती. त्यामुळे निर्णायक लढतीत अनफिट असलेल्या भुवनेश्वर कुमारला खेळविण्याचा जुगार कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळला. मात्र, भुवीला आपल्या लौकिकास साजेशी गोलंदाजी करता आली नाही, अन् ‘टीम इंडिया’ने सामन्यासह मालिकाही गमावली. त्यामुळे भुवनेश्वरच्या समावेशावरून ‘बीसीसीआय’ आणि रवी शास्त्री यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

‘बीसीसीआय’चे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, भुवनेश्वर कुमार हा दुखापतग्रस्त आहे, असे ज्यावेळी सांगण्यात आले, तेव्हा तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही, हे गृहीत धरले होते. पण, त्याला तरीही खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. जर कसोटी संघात त्याला समाविष्ट करून घायचे असेल, तर एकदिवसीय सामन्यात त्याला अर्धवट तंदुरुस्त अवस्थेत खेळवण्याचा अट्टहास का? असाही सवाल या अधिकाऱ्याने केला.

आपली प्रतिक्रिया द्या