शाळेत बसून ग्रह, तारे, आकाशगंगेचे दर्शन! विज्ञान आता विद्यार्थ्यांच्या दारी

जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱया विद्यार्थ्यांनादेखील ग्रह, तारे, आकाशगंगेचे दर्शन शाळेत बसून घेता येणार आहे. ‘विज्ञान विद्यार्थ्यांच्या दारी’ या अंतराळ व डिजिटल इंटरॅक्टिव क्लासरूम प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पार पडला.

कर्जत जामखेड येथील आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ’विज्ञान विद्यार्थ्यांच्या दारी’ हा प्रकल्प तयार झाला आहे. कर्जत जामखेड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन या विषयात रुची निर्माण व्हावी या दृष्टीने ‘सफर अंतराळाची’ तसेच शालेय विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी डिजिटल इंटरॅक्टिव क्लासरूम हे प्रकल्प तयार करण्यात आले आहेत.

कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे फिरते तारांगण व टेलिस्कोप प्रत्येक शाळेमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. तारांगणमध्ये विद्यार्थ्यांना नेहरू तारांगणप्रमाणे अवकाशाबद्दल रंजक माहिती मिळेल तसेच टेलिस्कोपद्वारे प्रत्यक्ष ग्रह, तारे बघायला मिळतील. आपल्यात आकाशगंगा, ग्रह, तारे, अंतराळ या सगळ्या गोष्टींबद्दल उत्कंठा निर्माण होईल आणि भविष्यात या क्षेत्रात आपले करीअर घडवतील, या अपेक्षेने सदर प्रकल्प सुरू केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

शिक्षणात रुची निर्माण व्हावी या दृष्टीने रोहित पवार यांनी योजलेल्या या प्रकल्पाची वर्षा गायकवाड यांनी प्रशंसा केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने अभ्यासक्रम समजावा आणि त्यांनी डिजिटल शिक्षण आत्मसात करावे यासाठी डिजिटल इंटरॅक्टिव पॅनल प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत देण्यात आहे. यापूर्वी 200 शाळांमध्ये पॅनल देण्यात आले. याप्रसंगी एकात्मिक विकास संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या