भाद्यात पाच जणांवर अ‍ॅक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, औसा

तालुक्यातील भादा येथे भांडणाचा आवाज ऐकूण रात्रीच्या वेळी भांडण करू नका म्हणून सोडविण्यासाठी गेले असता पाच जणांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तुझा काय संबंध म्हणून एकास शिवीगाळ करीत जीवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भादा येथील पाच जणांवर अ‍ॅक्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी मलीक दिलीप कांबळे (वय 27) रा. भादा हे 1 जून 2019 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास कामावरून येऊन जेवण करून झोपण्याच्या तयारीत असताना बाहेर रस्त्यावर भांडणाचा आवाज आला. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन भांडण करू नका म्हणून समजावून सांगत होते. त्यावेळी अमोल धोंडीराम माने, विक्की दत्तू भोरे, हिदायत पाशोद्दीन पठाण, गोविंद महादेव आंबड व शुभम भगवान जाधव सर्व रा. भादा व बोरगांव यांनी तुझा काय संबंध, तू कशाला मध्ये आलास? म्हणून अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ करून वरील पाच जणांनी मारहाण केली.

शुभम भगवान जाधव याने तुला तर कापूनच टाकतो म्हणून त्याने व त्याच्या साथीदारांनी माझे हात पकडून तीक्ष्ण हत्याराने अमोल माने यांनी प्राणघातक हल्ला केला. जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करून डोक्याला मारत असताना मी मान झुकविल्याने माझ्या नाकावर व ओठावर मार लागून नाकाचा शेंडा तुटला व मध्यभागातून ओठ कापल्याने रक्तबंबाळ अवस्थेत अक्षय उबाळे, सुर्यकांत उबाळे, जेजेरथ उबाळे व दिलीप कांबळे यांनी औसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी लातूरला नेले असता लातूरच्या डॉक्टरांनी सोलापूर किंवा संभाजीनगरला घेऊन जाण्यास सांगितले. रक्तस्त्राव थांबत नसल्याने लहाने हॉस्पिटल या खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे. माझ्यावर जिवे मारण्याच्या हेतूने प्राणघातक हल्ला करून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या दोषींचा तपास करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी तक्रार मलीक दिलीप कांबळे यांनी भादा पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी गुन्हा र.नं. 64/2019 प्रमाणे भादंवि कलम 307, 143, 147, 148, 149, 504 भादंवि कलम 3 (2) (5) 3, (1) (आर) (एस) अजाज प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजू नवले यांच्या मार्गदर्शनाखाली भादा पोलीस तपास करीत आहेत.