‘एटीएस’ जुहू युनिटची मोठी कारवाई, दोघा ड्रग्जमाफियांना पकडून साडेपाच कोटींचा एमडी जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

मुंबईतील हायप्रोफाईल नशेबाजांना ड्रग्ज पुरविणार्‍या सांगलीतल्या दोघा तस्करांना ‘एटीएस’च्या जुहू युनिटने दणका दिला. या दोघांना विलेपार्ले येथे चार किलो एमडीसह रंगेहाथ पकडून नंतर सांगलीतून आणखी 10 किलोंचा एमडी साठा जप्त केला. या कारवाईमुळे ड्रग्जमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

विलेपार्ले पूर्वेकडील पार्ले फाटक बसस्टॉपजवळ दोन तस्कर एमडीचा साठा विकण्यासाठी घेऊन येणार असल्याची खबर एटीएसच्या जुहू युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली. त्यानुसार नायक यांनी एटीएस प्रमुख देवेन भारती,  उपायुक्त विक्रम देशमाने, एसीपी श्रीपाद काळे यांच्या  मार्गदर्शनाखाली आपल्या पथकासह त्या ठिकाणी सापळा रचून शुक्रवारी दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडील सॅक बॅगची तपासणी केली असता त्यांच्याकडे चार किलो 300 ग्रॅम वजनाचा एमडी सापडला. त्यानंतर दया नायक यांनी त्यांची कसून चौकशी केल्यावर एकाचे नाव महेंद्र पाटील (49) तर दुसर्‍याचे संतोष आडके (29) असे असल्याचे व दोघेही सांगलीच्या कासेगावचे रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांनी गावाकडे एमडीचा साठा करून ठेवल्याचे समोर येताच नायक यांनी त्यांच्या पथकासह सासवड तालुक्यातील जाधववाडी गाठून तेथे एका पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेला  10 किलो एमडीचा साठा जप्त केला. अशाप्रकारे आरोपींकडून एकूण 14 किलो 300 किलो वजनाचा व पाच कोटी 60 लाख 75 हजार  किमतीचा एमडी जप्त केला.

अटक आरोपी हे मुंबईतील ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात होते. विशेष करून शहरातील हायप्रोफाईल नशेबाजांना ते एमडी पुरवायचे. शुक्रवारी देखील पश्चिम उपनगरातील नशेबाजांना विकण्यासाठी त्यांनी एमडी आणला होता. त्यांना कोर्टात हजर केले असता 12 तारखेपर्यत कोठडी सुनावण्यात आली. हे ड्रग्जमाफिया एमडी कुठे बनवतात, त्यांच्या साखळीत कोण कोण आहेत याचा दया नायक व त्यांचे पथक शोध घेत आहे.