भ्रष्ट प्रवृत्तींवर प्रहार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fighting against the corrupt system

>>प्रभाकर पवार

निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विलास तुपे यांचे भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध ‘फायटिंग अगेन्स्ट द करप्ट सिस्टीम’ हे 284 पानांचे पुस्तक अलीकडेच अरुण हरकारे (कुलस्वामिनी प्रकाशन) यांनी प्रकाशित केले आहे. कोरोनाची बाधा झाल्याने विलास तुपे यांना कोरोना काळात दुसऱ्या लाटेत गंभीर अवस्थेत कांदिवली येथील पार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. कुलदीप गायकवाड यांनी योग्य उपचार व काळजी घेतल्यामुळे तुपे यांचे प्राण वाचले. त्या काळात रुग्णालयातच विलास तुपे यांनी सरकारी खात्यातील विशेषतः पोलीस दलातील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध आपल्यातील लेखनीला वाव दिला. आपल्या 35 वर्षांतील पोलीस सेवेचा अनुभव, तपास, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार यावर त्यांनी आपल्या पुस्तकात प्रकाश टाकला आहे.

विलास तुपे 1976 साली महाराष्ट्र पोलीस दलात फौजदार म्हणून दाखल झाले व 2009 साली सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झाले. या 35 वर्षांच्या कालखंडात ते एकदाही आजारी पडले नाहीत, सेवेत कोणतीही कसूर केली नाही. त्यामुळे त्यांना शिक्षाही नाही किंबहुना त्यांच्या उत्कृष्ट तपासाचे, सेवेचे, धाडसाचे सरकारने भरभरून कौतुकच केले. दोन राष्ट्रपती पदके बहाल करून त्यांचा गौरव केला आहे. तरीही अशा प्रामाणिक अधिकाऱयाला पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर न्यायासाठी मोठा लढा द्यावा लागला, खोटय़ा आरोपांना सामोरे जावे लागले. नियत साफ असल्यामुळे तुपे अनेक संकटातून बाहेर पडले. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ प्रमाणे त्यांनी गुन्हेगारांचा निःपात केलाच; परंतु त्यांच्या तपासात आडवे येणाऱ्या स्वकियांनाही धडा शिकवला. चांगल्या प्रामाणिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच तुपे यांची कारकीर्द यशस्वी ठरली. ते वर्दीला कोणताही ‘डाग’ न लावता सेवेतून सन्मानाने निवृत्त झाले.

विलास तुपे यांना ‘प्रोबेशन’ काळातच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गुन्हेगारांशी असलेले लागेबांधे बघावे लागले. त्यानंतर त्यांना पोलीस ठाणे असो, क्राइम ब्रँच असो अथवा अॅण्टीकरप्शन असो साऱ्याच शासकीय यंत्रणांमध्ये, विभागांमध्ये गुन्हेगारांचे व शासकीय अधिकाऱ्यांचे, पोलिसांचे संबंध असल्याचे उघडय़ा डोळय़ांनी बघावे लागले. विलास तुपे यांचे मुंबईतील घाटकोपर हे पहिले पोलीस ठाणे! म्हणजे त्यांचा ‘प्रोबेशन काळ’! विलास तुपे रात्रपाळीला गस्तीवर असताना एक संशयास्पद टॅक्सी सुसाट वेगाने घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालेली तुपे यांनी पाहिली व पाठलाग करून टॅक्सी थांबविली असता त्यात टायरटय़ूबमध्ये गावठी दारू असल्याचे उघड झाले. तुपे यांनी टॅक्सीचालकाला व त्याच्या सहकाऱ्यांना मुद्देमालासह अटक केली, परंतु तुपे यांच्या वरिष्ठ फौजदाराला ही कारवाई आवडली नाही. तो तुपेंवर भडकला. ‘तुला हप्ता पाहिजे काय?’ असा सवाल केला. तेव्हा तुपे त्याला म्हणाले, ‘‘माझ्या गावी आमची बरीच बागायती जमीन आहे. मला बेईमान लोकांकडून पैसे नकोत! मी हरामचा पैसा कमावण्यासाठी पोलीस दलात भरती झालेलो नाही,’’ असे बोलल्यावर त्या वरिष्ठ फौजदाराने तुपेंना ‘तुला बघून घेईन’ अशी धमकी दिली, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळमकर यांनी तुपे यांच्या कारवाईचे कौतुक केले. त्यानंतर याच घाटकोपर विभागाचे एसीपी विल्यम यांनी तुपे यांच्या वार्षिक अहवालात अतिउत्कृष्ट (म्हणजे ए प्लस) शेरा लिहिण्यासाठी तुपेंकडे ‘ब्लू लेबल’ या अत्यंत महागडय़ा स्कॉच व्हिस्कीची मागणी केली होती. तेव्हा तुपे म्हणाले, ‘मी मद्यपान करीत नाही, शिवाय माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्या पगाराइतकी या दारूच्या बाटलीची किंमत आहे, मला परवडणार नाही.’ असे बोलल्यानंतर तुपे यांची दुसऱ्या दिवशी वायरलेसवर डय़ुटी लावण्यात आली. तुपे यांना प्रोबेशन काळातच हा पहिला धक्का होता. वरिष्ठांकडूनच पैशांसाठी, लाचेसाठी त्यांना छळण्यात आले. तरीही ते डगमगले नाहीत. निःस्वार्थीपणे त्यांचा पोलीस तपास सुरूच राहिला. कुणी ना कुणी वरिष्ठ अधिकारी तुपे यांच्या बाजूने उभे राहायचे. त्यामुळे भ्रष्ट पोलीस अधिकाऱयांची सर्व कटकारस्थाने उद्ध्वस्त व्हायची.

पोलीस ठाण्यात असो की क्राइम ब्रँचमध्ये काम करताना तपास करताना भ्रष्ट अधिकाऱयांचा, राजकीय पुढाऱयांचा हस्तक्षेप असायचा; परंतु विलास तुपे यांचा तपास योग्य रितीने असायचा. कोणतीही लपवाछपवी नसायची. ‘सत्यमेव जयते’प्रमाणे त्यांचे काम असायचे. त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास झाला. तरीही ‘सत्य’ हाच आदर्श त्यांनी मानला आणि काम सुरू ठेवले. पोलीस दलातील त्यांच्या सहकाऱयांनी, वरिष्ठांनी त्यांना खोटय़ा केसेसमध्ये गुंतविण्याचा प्रयत्न केला; परंतु तो पह्ल ठरला.

विलास तुपे यांनी अॅण्टी करप्शनमध्ये कार्यरत असताना उत्कृष्ट तपास केला होता; परंतु तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बिल्डर लॉबीच्या दबावामुळे हा तपास गुंडाळून टाकला. पोलीस महासंचालक कार्यालयातील व मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱयांच्या बदली रॅकेटवरही तुपे यांनी चांगलाच प्रकाश टाकला आहे. तुपे यांनी न डगमगता पोलीस खात्यातील भ्रष्ट प्रवृत्तींची आपल्या पुस्तकात पोलखोल केली आहे. त्यामुळे तुपे यांचे ‘फायटिंग अगेन्स्ट द करप्ट सिस्टीम’ हे पुस्तक अत्यंत माहितीपूर्ण व वाचनीय झाले आहे.

फायटिंग अगेन्स्ट द करप्ट सिस्टीम (भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढा)

लेखक – विलास तुपे

संपादक – राजेश आजगावकर

प्रकाशक – कुलस्वामिनी प्रकाशन

पृष्ठ – 284, मूल्य – रुपये 299/-