नगर जिल्ह्यात गुंडाराज, पोलिसाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहाता

गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला चार ते पाच गुंडांनी मारहाण केल्याची घटना नगर जिल्ह्यातील राहाता येथे सराफ बाजारात घडली. चार ते पाच जणांच्या टोळक्याने लाकडी दांड्याने पोलिसाला मारहाण केली. बेदम मारहाण होत असतानाही रक्तबंबाळ अवस्थेतही पोलिसाने टोळक्यातील एकाला पकडून ठेवल्याने पोलिसाच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

राहात्यामध्ये बाजारच्या दिवशी अवैध धंदे तेजीत असतात. पिंपळवाडी येथे विटभट्टीवर काम करणारा मजुर गुरूवारच्या आठवडे बाजारला आला होता. बाजार करताना एका सोरटच्या ठिकाणी त्याला सोरट चालवणा-या टोळक्याने खेळण्यासाठी बळजबरी केली, परंतु त्याने खेळण्यास नकार दिला. याचा राग आल्याने त्याच्याकडील पैसे टोळक्याने हिसकाऊन घेत त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत रामनरेश केवड याच्या डोक्याला मार लागल्याने तो रक्तबंबाळ झाला. त्याने जखमी अवस्थेत पोलीस स्टेशन गाठले. त्याची अवस्था पाहून पोलीस कॉन्स्टेबल सुनिल मालणकर हा त्याच्या सोबत संबंधित टोळक्याला पकडण्यासाठी गेले. गावगुंडाच्या टोळक्याने मागे पुढे न पाहाता पोलीस कॉन्स्टेबल मालणकर यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला केला. चार ते पाच जणांनी पोलिसाला अमानुषपणे मारहाण केली. मारहाण होत असतानाही मालणकर यांनी टोळक्यातील एकाला पकडून ठेवले. हा मारहाणीचा प्रकार सिसीटीव्हीत कैद झाला आहे.

दरम्यान, जखमी मजुर रामनरेश केवड आणि पोलीस कॉन्स्टेबल सुनिल मालणकर यांना राहाता ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मालणकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.