
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
नववर्षानिमित्त शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जयभवानीनगरातील ‘साईलीला परिवार’ पालखी घेऊन पायी निघाला. सोमवारी रात्री मंदिराकडे जाताना दरोडेखोरांनी पालखीवर हल्ला केला. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले असून, हल्ला करणाऱ्या चार दरोडेखोरांना शिर्डी पोलिसांनी गजाआड केले आहे. दरोडेखोरांना अटक केली असली, तरी त्यांचे सहा साथीदार अद्यापही फरार आहेत.
जयभवनीनगर, विश्रांतीनगर आणि राजनगरातील ‘साईलीला परिवार’ नववर्षानिमित्त शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी २०० साईभक्त आणि महिलांना घेऊन २८ डिसेंबर रोजी सायंकाळी पायी निघाले होते. पदयात्रा ३१ डिसेंबर रोजी पाच वाजता लिंबगाव येथे पोहचली. जेवणानंतर मंदिरात दर्शन करण्यासाठी निघाले असताना पालखीमध्ये काही दरोडेखोर शिरले आणि साई अश्राम दोनजवळ महिलांना धक्काबुक्की करत त्यांनी अंधारात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे हिसकावण्याचा प्रयत्न केला. महिलांनी आरडाओरड केल्यामुळे पालखीतील शिवसैनिकांनी दरोडेखोरांना पकडून चोप दिला. त्यानंतर ते दरोडेखोर आपली सुटका करून घेत पळून गेले. नंतर पुन्हा दुचाकी, रिक्षा, बुलेटवरून ते पुन्हा आले. त्यांनी लाठ्याकाठ्यांनी पालखीवर हल्ला केला. यामध्ये शाखाप्रमुख मंगेश वाधवाणी, सुभाष लोहाडे, नीलकंठ ठाकूर हे चौघे जखमी झाले. पालखीवर हल्ला झाल्यामुळे सर्वच जण घाबरून गेले. हिंमत पटेल यांनी सर्वांना धीर दिला आणि शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली. त्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे यांनी पोलीस उपअधीक्षकांशी चर्चा केली आणि पालखीवर हल्ला करणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्याच्या सूचना दिल्या.
हिंमत पटेल यांनी जखमी झालेल्या भाविकांना शिर्डी पोलीस ठाण्यात नेले. शाखाप्रमुख मंगेश वाधवाणी यांनी तक्रार दिली. तेव्हा दरोडेखोरांच्या मदतीसाठी थेट ठाण्यातच पोलिसांचे दोन खबरी आले, त्यांनी गुन्हा दाखल करू नये, यासाठी पोलिसांकडे आग्रह धरला, त्यावेळी हिंमत पटेल, वाधवाणी आणि शिवसेना महिला आघाडीच्या शिवकन्या भोसले यांच्यासह पालखीतील साईभक्तांनी ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या गुन्ह्यात कमलेश कदम, अजय अहिरे, रवी भोसले, प्रवीण जाधव या चौघांना अटक केली. त्या चौघांना राहता येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता तपास अधिकाऱ्यांनी गुन्हा गंभीर असून हे दरोडेखोर पालखीवर कायम हल्ले करत असतात, त्यांच्या अन्य साथीदारांची नावे निष्पन्न करून त्यांना अटक करावयाची आहे, गुन्ह्यात वापरलेली बुलेट, रिक्षा, लाठ्या – काठ्या जप्त करावयाच्या आहेत. दरोडेखोरांनी ठाकूरच्या खिशातील रोख १० हजार आणि मंगेशच्या अंगातील जॅकेट व त्यामध्ये असलेले १२०० रुपये बळजबरीने हिसकावून नेले, ती रक्कम हस्तगत करावयाची असल्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती केली असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.




























































