
राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांमधील 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ हजर राहण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास सध्या तरी परवानगी नसली तरी ऑनलाईन, ऑफलाईन आणि दूरस्थ शिक्षणासंदर्भात कामकाज करण्यासाठी शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
31 ऑक्टोबरपर्यत प्रत्यक्ष शाळा बंदच असून पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यतच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीनेच सुरू आहे. मात्र सरकारी, खासगी अनुदानित, विनाअनुदानित अशा सर्व शाळांमधील 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालेय कामकाजासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. याविषयीचा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला आहे.
शिक्षण विभागाचा अध्यादेश अस्पष्ट
शिक्षण विभागाने काढलेला आदेश गोंधळाचा असल्याचे मुख्याध्यापक संघटनेचे म्हणणे आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रत्यक्षात उपस्थितीबाबत काय निर्णय घ्यायचा? कारण शिक्षण ऑनलाईन देण्यास सांगितले आहे. मग शिक्षकांची उपस्थिती किती व का ठेवायची? तसेच दिवाळी सुट्टीबाबतही काहीही स्पष्टता नाही. इतर अंमलबजावणी करण्यासाठी जो निधी लागणार आहे, त्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे जोपर्यंत सरकारचे स्पष्ट आदेश निघत नाहीत, तोपर्यंत परिस्थितीत कोणताही बदल न करण्याचा निर्णय मुंबई मुख्याध्यापक संघटनेने घेतला असल्याचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितले.
या आहेत सूचना
- पालकांच्या लेखी संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा.
- कोविड सेंटरसाठी वापरात असलेल्या शाळेत प्रवेश करण्यापूर्वी शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
- बायोमेट्रीक हजेरीऐवजी स्पर्शविरहीत हजेरीचा पर्याय स्वीकारावा.
- हात धुणे, सॅनिटायझर, मास्कचा वापर करावा.




























































