
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
शहरातील विविध पोलीस ठाणी आणि गुन्हे शाखेतील अंतर्गत गटबाजीचा पुरेपूर फायदा घेत चोरट्यांनी शहरात चोरी, घरफोडी आणि लूटमारीचे सत्र बिनधास्त चालवले आहे. पोलिसांचा धाक नसलेल्या चोरट्यांनी सिडकोत सोनाराचे दुकान, गुरुगोविंदसिंगपुरा भागातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला तसेच मुकुंदवाडी हद्दीतील घर फोडून लाखो रुपयांचे दागिने पळवले तर जिन्सी हद्दीतून ट्रॅव्हलर्स बसच पळवली. चोऱ्या घरफोड्यांचे सत्र वाढतच चालल्याने पोलिसांविषयी संताप व्यक्त होत आहे.
भरदिवसा एटीएम फोडले, रक्कम सुरक्षित
गुरुगोविंदसिंगपुरा भागातील दिग्जाम शो-रूमजवळ सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. आज शुक्रवारी सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र या एटीएमवर ऑनलाईन पहारा बसवलेला होता. त्याचे कंट्रोलरूम मुंबईत आहे. कुणीही एटीएममध्ये गडबड केली की, या कंट्रोलरूममध्ये सायरन वाजतो. तेथील व्यक्ती लगेचच नाव आणि नंबरची विचारणा करते. चोरट्यांनी मशीनचे वायर तोडले आणि टॉमीने एटीएमवर वार करताच अचानक सायरन वाजले तसेच एटीएमच्या स्पीकरमधून नाव आणि नंबर विचारला जाऊ लागला. ही विचारणा होताच चोरट्यांनी घाबरून तेथून पळ काढला. नंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
गुरुगोविंदसिंगपुरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कल्याण शेळके, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अनिल वाघ हे पथकासह घटनास्थळी आले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी एटीएम मशीनची देखभाल करणाऱ्या कंत्राटदाराला बोलावून मशीनची पाहणी केली असता आतील दोन लाख ७० हजारांची रक्कम सुरक्षित असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यास सुरुवात केली असून, एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजचे कंट्रोलिंग मुंबई येथील मुख्यालयात असल्याने पोलिसांना आतील सीसीटीव्ही फुटेज मिळू शकले नाही. या प्रकरणी बँकेचे सहायक व्यवस्थापक सौरभ अनिलकुमार सोलंकी यांच्या तक्रारीवरून गुरुगोविंदसिंगपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही शहराच्या विविध भागात तसेच गुरुगोविंदसिंगपुरा भागात एटीएम फोडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र एकही गुन्हा उघड करण्यात पोलिसांना अद्याप तरी यश आले नाही हे विशेष!
मुकुंदवाडीत घर फोडून ऐवज लंपास
मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी व घरफोडीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून एकही चोरीचा गुन्हा उघड करण्यात डी.बी. पथक आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले नाही. याचाच फायदा उचलत जयभवानीनगरातील करण रामराव नरोटे हे बुधवारी रात्री परिवारासह घरात झोपलेले असताना चोरट्यांनी चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करत किचन रूममध्ये प्रवेश करून हॉल आणि किचन रूमच्या खोलीतील उघड्या कपाटातून दोन तोळे सोन्याचे दागिने, २० तोळे चांदीचे दागिने आणि आठ हजारांची रोख रक्कम लंपास केली.
महिलेवर बलात्कार
जाधववाडी येथील ३२ वर्षीय महिला ही शेंद्रा येथील खासगी कंपनीत कामगार आहे. आंबेडकर चौकातील राहुल घुगे याने महिलेशी ओळख वाढवून तिच्याशी जवळीक वाढवली. त्यानंतर राहुल याने नव्याने बांधण्यात येणाऱ्या घरात नेऊन धाक दाखवून महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर तयार केलेली व्हिडीओ क्लिप पतीला दाखवण्याची धमकी देत राहुल याने तिचा वेळोवेळी लैंगिक छळ केला. तसेच पतीकडून घटस्फोट घेण्यास भाग पाडून राहुल याने महिलेस मुकुंदवाडीत खोली भाड्याने घेऊन संसार सुरू केला. महिलेने लग्नासाठी तगादा लावला असता राहुल याने लग्नास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने हर्सूल पोलीस ठाण्यात राहुल घुगेविरुद्ध तक्रार दिली.
सिडकोत सराफाचे दुकान फोडले
सिडको एम-२ येथील लाईफलाईन हॉस्पिटलसमोरील भक्ती पल्स अॅण्ड ज्वेलर्स या दुकानाचे मालक मुकेश सोनार हे गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गेले असता तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून रात्री सव्वातीन वाजेच्या सुमारास आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील चांदीची मोड लंपास केली. मात्र दुकानातील दागिने आणि इतर ठिकाणी ठेवलेल्या चांदीच्या दागिन्यांना चोरट्यांनी हातही लावला नाही. सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेसी यांनी पथकासह घटनास्थळी पोहोचून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली.






























































