ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला मोठा झटका, टिम पेनचा कर्णधारपदाचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेट जगतातील प्रसिद्ध अॅशेस मालिकेआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा झटका मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

एका महिला सहकाऱ्याला आपला अश्लील फोटो आणि मेसेज पाठवल्याचा आरोप टिमवर झाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्या दरम्यानच टिमने राजीनामा दिला आहे. आता अॅशेस मालिकेत उपकर्णधार पॅट कमिन्स हा कर्णधारपदी असेल, अशी अटकळ व्यक्त केली जात आहे.

हे प्रकरण 2017मधील आहे. क्रिकेट तस्मानियाच्या एका महिला कर्मचाऱ्याला टिमने त्या अश्लील फोटो पाठवला होता. त्यानंतर त्याने काही आक्षेपार्ह मेसेज देखील पाठवले होते. हे प्रकरण उघड झाल्यानंतर टिमला अॅशेस मालिकेपूर्वी कर्णधारपद सोडावं लागलं होतं. पण, त्यानंतर केलेल्या चौकशीत दोन्ही देशांच्या चौकशी समितींनी त्याला क्लीन चिट दिली होती.

पण, हे प्रकरण संपलं असं वाटत असतानाच ते मेसेज सार्वजनिक झाले. त्यामुळे हे कृत्य कर्णधार म्हणून नैतिक पातळीवर योग्य नसल्याचं म्हणत टिमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. अॅशेस ही महत्त्वाची मालिका असल्याने या मालिकेपूर्वी संघाच्या तयारीत व्यत्यय येऊ नये, म्हणून हा राजीनामा देत असल्याचं स्पष्टीकरण टिमने दिलं आहे.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट नियामक मंडळाचे प्रमुख रिचर्ड फ्रेडेस्टेन यांच्या म्हणण्यानुसार, पेनचा हा वैयक्तिक निर्णय आहे. टिमला वाटलं की हे सगळं त्याचं कुटुंब आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेटसाठी योग्य नाही. वास्तविक काही काळापूर्वी टिमला या प्रकरणी क्लीन चिट मिळाली होती. पण, आता त्याने घेतलेल्या या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो, असं रिचर्ड म्हणाले आहेत.