
लॉकडाउनमध्ये दिवसभरात फक्त 100 रुपये मिळविण्यासाठी रिक्षा चालकांची वणवण सुरूच आहे. मात्र, तरीही नेटाने व्यवसाय करून कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या एका रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे शहरभर कौतुक होत आहे. प्रवाशाची रिक्षात विसरलेली तब्बल 11 तोळ्यांची सोन्याची पिशवी आणि 20 हजारांची रोकड त्यांना मिळाली होती. दागिन्यांमुळे रिक्षाचालकाचे संपूर्ण आयुष्य ऐषोआरामात गेले असते. मात्र, त्या पिशवीला धक्का ही न लावता चालकाने थेट रिक्षाच पोलीस चौकीत नेऊन सोन्याने भरलेली पिशवी पोलिसांच्या ताब्यात दिली. त्यामुळे पोलिसांनाही या प्रामाणिक रिक्षाचालकाला कडक सॅल्युट केला.
घोरपडीमधील आदर्श पार्कमध्ये राहणारे विठ्ठल मापारे (वय 60, रा. घोरपडी ) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्यांच्यामुळे प्रवाशी मेहबूब शेख (वय 63) आणि पत्नी शहनाज शेख (वय 53) यांना जवळपास 7 लाखांचे दागिने परत मिळाले. त्यामुळे दाम्पत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. माणसातला विठ्ठल मेहबूब चाचाला भेटल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
केशवनगरमधील लोणकर वस्तीतील शेख दाम्पत्य बुधवारी विठ्ठल मापारे यांच्या रिक्षातून (एम एच 12 एन.डब्ल्यू 3505) गाडीतळ बसस्टॉप येथे उतरले होते. त्यानंतर रिक्षाचालक विठ्ठल पुन्हा बी. टी. कवडे येथील रिक्षा स्टॅडला लावून चहा पिण्यासाठी गेले. माघारी आल्यानंतर त्यांना रिक्षामध्ये प्रवाशाची बॅग राहिल्याचे दिसून आले. त्यांनी स्टॅण्डवरील रिक्षाचालकांना बॅगची माहिती दिली. त्यावेळी मित्रांनी त्यांना बॅग उघडून तर पाहू असे म्हटले. मात्र, तब्बल 25 वर्षांपासून रिक्षाचालविणाऱ्या विठ्ठल यांनी बॅग उघडण्यास नकार दिला. त्यानंतर रिक्षा थेट घोरपडी पोलीस चौकी नेऊन त्यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली. विठ्ठल यांनी बॅगेला हातही लावला नसल्यामुळे पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी तातडीने बॅग ताब्यात घेउन हडपसर पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर बॅगची तपासणी केली असता, त्यामध्ये तब्बल 11 तोळे सोन्याचे दागिने आणि 20 हजारांची रोकड मिळून आली. तोपर्यंत पोलिसांनी तक्रारदाराची माहिती काढून शेख दाम्पत्याला पोलीस चौकीत बोलावून घेतले. त्यांची हरवलेली बॅग सर्व मुद्देमालासह परत करण्यात आली. सोने, चांदी व पैशासह बॅग परत मिळाल्याने जेष्ठ दाम्पत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. रिक्षामध्ये विसरलेली सोन्याने भरलेली बॅग विठ्ठल यांच्या प्रामाणिकपणामुळे परत मिळाल्याने शेख दाम्पत्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. प्रामाणिकपणामुळे रिक्षचालक विठ्ठल मापारे यांचा पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय कदम, सहायक पोलीस फौजदार निसार शेख उपस्थित होते.
लॉकडाऊनमुळे चार महिने रिक्षा बंद होती. मात्र, परमेश्वराने काहीही कमी पडू दिले नाही. रिक्षात मिळालेले 11 तोळे दागिने आणि 20 हजार रुपये घेउन मला काही दिवसांचे सुख मिळाले असते. पंरतु, रात्री शांत झोप लागली नसती. शहरात मागील 25 वर्षांपासून रिक्षा चालवित असून प्रवाशांचे विसरले मोबाईल, पैशांचे पाकिट वेळोवेळी परत केले आहे. दागिने परत दिल्यामुळे पोलिसांनी माझा सगळ्यांसमोर सत्कार केला, हीच माझी कमाई आहे.
-विठ्ठल मापारे, रिक्षाचालक, पुणे






























































