
पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस कोचिंग डेपोमध्ये नवा स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट सुरू केला आहे. या स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांटमुळे हाताने रेल्वेचे डब्यांना धुण्याच्या तुलनेत 80 टक्के पाण्याची बचत होणार आहे. तसेच बाह्य धुलाईसाठी होणाऱया खर्चात प्रतिवर्षी 50 लाखांची बचत होणार आहे. 24 डब्यांच्या एका ट्रेनला धुण्यासाठी आता केवळ दहा मिनिटे लागणार आहेत.
पश्चिम रेल्वेने अलीकडेच वांद्रे टर्मिनस कोचिंग डेपो आणि गांधीधाम येथील कोचिंग डेपोमध्ये दोन स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट सुरू केले आहेत. ही यंत्रणा संपूर्ण ट्रेन धुण्याची प्रक्रिया पूर्ण करताना वेळ, पाणी आणि मानवी श्रम बचत करण्यास मदत करते. संपूर्ण स्वयंचलित यंत्रणेमुळे डेपोच्या बाह्य धुलाई गुंतवणुकीत प्रतिवर्ष 50 लाखांची बचत होणार आहे. वांद्रे टर्मिनस आणि गांधीधाम कोचिंग डेपोच्या स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांटमध्ये दर ताशी 5 ते 8 कि.मी.वेगाने ट्रेन धुता येणार आहे. यासाठी जास्तीत जास्त 60 लिटर प्रति कोच पाण्याची आवश्यकता लागणार असून हाताने कोच धुण्यापेक्षा 80 टक्के कमी पाणी लागणार आहे. या संयंत्रासाठी शुद्ध पाण्याची आवश्यकता केवळ 20 टक्के लागणार आहे. धुलाईसाठी लागणारे 80 टक्के पाणी पुनर्वापर करता येणार आहे. ही यंत्रणा पाण्याचा आणि वेळेचा सदुपयोग यात अत्यंत कुशल असून 24 डब्यांच्या ट्रेनची एण्ड टू एण्ड सफाईसाठी केवळ दहा मिनिटे लागणार आहेत. हा स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट एक पर्यावरण अनुकूल असून ट्रेनची स्वच्छता राखण्याचा प्रभावी पर्याय ठरणार आहे.































































