
आयटी क्षेत्रातील प्रतिष्ठीत कंपनी असलेल्या विप्रो कंपनीचे संस्थापक अजीम प्रेमजी हिंदुस्थानमधील दानशूरांमध्ये अव्वल ठरले आहेत. त्यांनी 2019-20 या आर्थिक वर्षात सुमारे 7 हजार 904 कोटी रुपये दान केले आहेत. हारून इंडियाने जारी केलेल्या दानशूर हिंदुस्थानींच्या यादीतून ही माहिती मिळाली आहे. अजीम प्रेमजी यांच्याप्रमाणे इतर उद्योगपतींनीही विविध सामाजिक कार्यासाठी दान केले आहेत. कोणत्या उद्योगपतींनी किती दान केले आणि ते यादीत कोणत्या स्थानावर आहेत, याबाबत जाणून घेऊया.
अजीम प्रेमजी यांनी 2019-20 या आर्थिक वर्षात केलेल्या दानाची सरासरी काढल्यास दररोज त्यांनी सुमारे 22 कोटी रुपयांचे दान केले आहे. याआधीच्या आर्थिक वर्षात त्यांनी 426 कोटींचे दान केले होते. या आर्थिक वर्षातही त्यांच्या समुहाने कोरोनाविरोधातील लढाईसाठी 1125 कोटी रुपये दान करण्याची घोषणा केली आहे. एचसीएल टेक्नोलॉजीचे शिव नाडर या दानशूरांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. या आधीच्या आर्थिक वर्षात ते पहिल्या स्थानावर होते. नाडर यांनी शिक्षण क्षेत्रात शिष्य़वृत्तीसाठी चांगले काम केले आहे, सुमारे 30 हजार विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे.
रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी दानशूरांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाने 2019-20 या आर्थिक वर्षात 458 कोटी रुपयांचे दान केले आहे. कोरोनाविरोधातील लढाईसाठी पीएम केअर फंडमध्ये 500 कोटी रुपये देण्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी यावर्षात 30 मार्चला केली होती. मात्र, ही रक्कम या आर्थिक वर्षात मोजली जाणार असल्याने 2019-20 या आर्थिक वर्षातील दानाच्या रकमेत त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.
दानशूरांच्या यादीत आदित्या बिर्ला सुमहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला चौथ्या स्थानावर आहेत. त्यांनी एका वर्षात 276 कोटी रुपये सामाजिक कार्यासाठी दान केले आहेत. आदित्या बिर्ला समुहाचे बिर्ला फाऊंडेशन शिक्षण,आरोग्य, सौरऊर्जा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. या यादीत वेदांता रिसोर्सेसचे अध्यक्ष अनिल अग्रवाल पाचव्या स्थानावर आहेत. त्यांनी 215 कोटी रुपयांचे दान केले आहे. अग्रवाल यांचे वेदांता फाऊंडेशन शिक्षण, सामुहिक विकास, महिला सशक्तीकरणासाठी महत्त्वाचे काम करत आहे. तर पीरामल समुहाचे अजय पीरामल आणि त्याचे कुटुंब या यादीत सहाव्या स्थानावर आहे. त्यांनी 196 कोटी रुपयांचे दान केले आहे. तर इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष नंदन नीलकेणी 159 कोटी रुपयांचे दान करत यादीत सातव्या स्थानावर आहेत.
दानशूर व्यक्तींच्या हारूनच्या यादीत आठव्या स्थानावर हिंदुजा ब्रदर्स आहेत. त्यांनी वर्षभरात 133 कोटी रुपये दान केले आहेत. तर गौतम अदानी या यादीत नवव्या स्थानावर आहेत. त्यांनी 88 कोटींचे दान केले आहे. तर दहाव्या स्थानावर बजाज समुहाचे राहुल बजाज आणि त्यांचे कुटुंब आहे. त्यांनी वर्षभरात 74 कोटी रुपयांचे दान केले आहे. जमनालाल बजाज फाऊंडेशन हेल्थकेअर, शिक्षण, ग्राण विकास यासारख्या क्षेत्रांमध्ये काम करत आहे. दानशूर व्यक्तींमध्ये अजीम प्रेमजी आदर्श असून इतर उद्योगपतींनाही ते सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देतात.






























































