
सामना ऑनलाईन । मुंबई
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि ‘विप्रो’ कंपनीचे संस्थापक अझीम प्रेमजी याच वर्षी 30 जुलै रोजी निवृत्त होत असल्याची घोषणा कंपनीने गुरुवारी केली. प्रेमजी निवृत्त होणार असले तरी 31 जुलैपासून ते पुढील पाच वर्षांसाठी कंपनीमध्ये गैर कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतील. अझीम प्रेमजी यांनी 53 वर्षे कंपनीची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली आणि कंपनीला नव्या शिखरावर नेऊन पोहोचवले.
कंपनीने अझीम प्रेमजी यांना संस्थापक-अध्यक्ष म्हणून सन्मानित केले आहे. हिंदुस्थानी तंत्रज्ञान क्षेत्राच्या युगाचे अझीम प्रेमजी हे अग्रणी आहेत. अझीम प्रेमजी यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जागा त्यांचे पुत्र रिशद प्रेमजी घेतील. तर मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दाली निमुचवाला हे 31 जुलैपासून विप्रोचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम पाहतील, असे कंपनीने आपल्या पत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.
याच वर्षी मार्चमध्ये अझीम प्रेमजी यांनी कंपनीतील आपल्या भागभांडवली मालकीतून येणाऱ्या लाभातील 34 टक्के आर्थिक लाभ सेवाभावी कार्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. विप्रोमध्ये प्रेमजी यांची वैयक्तिक समभाग मालकीचे मूल्य सुमारे 52,750 कोटी रुपयांचे आहे. त्यांच्या या निर्णयाने ‘अझीम प्रेमजी फाऊंडेशन’ या त्यांच्या सेवाभावी कार्यासाठी असलेल्या संस्थेचा एकूण देणगी कोष 1.45 लाख कोटी रुपयांवर गेला आहे.




























































