प्रसिद्ध किर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध किर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या विधनाने वारकरी संप्रदायाचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. बाबामहाजारांचे मूळ नाव हे नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे होते. त्यांचा जन्म सातारा येथे झाला होता. त्यांच्या कुळात 135 वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले होते. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले होते.

वयाच्या 12 व्या वर्षांपासून त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रावर गाण्यास सुरुवात केली. वडिलांकडून त्यांनी पखवाज वादनाचे शिक्षण घेतले. 26 मार्च 1954 रोजी बाबा महाराजांचा विवाह वारकरी संप्रदायातील देशमुख महाराज यांचे वीणेकरी पांडुरंग जाधव यांची नात दुर्गाबाई नामदेव जाधव यांच्याशी झाला. 1950 ते 1954 या काळात बाबामहाराज यांनी लाकूड सामानाचा (फर्निचर) व्यवसाय केला. पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला.

सुमारे 150 वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे 80 हून अधिक वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे 100 वर्षे राखली आहे. 1962 साली आप्पा महाराज यांच्या देहावसानानंतर त्यांची परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश अशा राज्यात कीर्तन – प्रवचनांचे शेकडो कार्यक्रम त्यांनी केले.

1974 साली श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबई, आळंदी, पंढरपूर येथे कीर्तन महोत्सवांचे आयोजन त्यांनी केले. 1980 ते 1999 या कालावधीत ज्ञानेश्वरीची प्रवचने त्यांनी केली. 1998 ते 2001 या कालावधीत अमृतानुभवावर प्रवचने केली. डिसेंबर 1983 पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. भंडारा डोंगर, देहू , त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदी ठिकाणी त्यांनी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले. बाबामहाराजांनी सुमारे 15 लाख व्यक्तींना संप्रदायाची दिक्षा देऊन त्यांना व्यसनमुक्त केले. 1983 साली त्यांनी जनसेवेसाठी श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत 60 ते 70 हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा तसेच औषधे पुरविण्यात येतात. 1986 साली लंडन येथे हिंदीतून चार प्रवचने तसेच अमेरिकेत बोस्टन, फिलाडेल्फिया, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, आरलँडो आदी ठिकाणी 14 ज्ञानेश्वरी प्रवचने बाबामहाराजांनी केली आहेत.

पुरस्कार आणि सत्कार

  • श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आणि आध्यात्मिक पुरस्कार (1986),
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनातर्फे सत्कार (1990),
  • पुणे महानगरपालिकेतर्फे मानपत्र (1990),
  • सासवड नगरपरिषदेतर्फे सत्कार (1990),
  • महाराष्ट्र शासनातर्फे मानपत्र (1991),
  • जागतिक मराठी परिषद दिल्ली यांच्याकडून तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते सत्कार (1994)