पांझरा नदीकाठालगतच्या रस्त्याची दुरवस्था; डांबरीकरण वाहून गेले

243
प्रतिकात्मक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । धुळे

धुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील वसाहतींचे नुकसान झाले. अलीकडेच नदीकाठालगत तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली. रस्त्यांवरील डांबरीकरण वाहून गेल्याने खडी वर आली आहे. शिवाय, संरक्षक भिंतीचा काही भाग ठिकठिकाणी कोसळला आहे. पुराचे पाणी आणि वेग लक्षात घेता रस्त्याचे डांबरीकरण करण्याऐवजी काँक्रीटीकरण करायला हवे होते, अशा प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केल्या.

धुळे जिल्हय़ात रविवारी मध्यरात्रीपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस सोमवारी दुपारी चारपर्यंत कमी-अधिक वेगाच्या सरी घेऊन अखंडपणे बरसला. साहजिकच जिल्हय़ातून वाहणाऱया प्रमुख नद्या आणि उपनद्यांना पूर आला. पावसामुळे पिकांना फायदा झाला असला तरी नद्यांच्या पुराने सर्वच घटकांचे नुकसान केले आहे. शहरातून वाहणाऱया पांझरा नदीवरील पुलाची हानी झाली. पुराच्या पाण्याचा वेग जास्त असल्याने पुलावरील पथदिवे आडवे झाले. अनेक पथदिव्यांचे खांब वाहून केले. सावरकर पुतळय़ासमोरील पुलाचे नुकसान झाले आहे. या पुलावर अनेक ठिकाणी मोठय़ा आकाराचे खड्डे पडले असून स्लॅबचा भाग पुरात वाहून गेला. त्यामुळे केवळ सळय़ांचा सांगाडा दिसत आहे. सद्या हा पूल रहदारीसाठी बंद आहे. परंतु पुलाच्या दुरवस्थेची म्हणावी तशी गंभीर दखल प्रशासनाने घेतलेली नाही. शक्य तितक्या लवकर पूल सुस्थितीत आणावा अशी अपेक्षा नागरिकांची आहे.

पांझरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा वेग जास्त होता. त्यामुळे अलीकडेच नदीकाठावर उभारण्यात आलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली. या रस्त्यालगत संरक्षक भिंती तयार करण्यात आली होती. या भिंतीला ठिकठिकाणी हानी पोहोचली. रस्त्यावरील डांबराचा थर पुरात वाहून गेला. रस्त्यावरी खडी वर आली असून ती पादचाऱ्यांना त्रासदायक आहे. याशिवाय नवीन रस्ते साकारताना काही भागात सिमेंटचे पेव्हरब्लॉक बसविण्यात आले होते. परंतु हे पेव्हर ब्लॉकदेखील उखडले गेले. काही पेव्हर ब्लॉक पुराच्या पाण्यात वाहून गेले. सुमारे चाळीस वर्षांनंतर असा पूर पाहिला. पुरामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे, असे उमेश घोडेस्वार यांनी सांगितले. बऱयाच वर्षांनंतर पूर आल्यामुळे पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली.

आपली प्रतिक्रिया द्या