
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
तीन दशकांपूर्वी हिंदुस्थानच्या रस्त्यांवर दिमाखात धावणारी आणि मध्यमवर्गीयांची स्टेटस सिम्बॉल असलेली बजाजची चेतक स्कूटर 13 वर्षांनी परत येतेय. ‘बजाच चेतक’ ही अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या फिचर्ससह रिलाँच करण्यात येणार असल्याचे समजते.
देशात दुचाकी बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये बजाज ऑटो ही दुसरी सर्कात मोठी कंपनी आहे. बजाजने चेतक ही प्रसिद्ध स्कूटर पहिल्यांदा 1972 मध्ये लॉन्च केली होती. ‘नए भारत की नई उम्मीद, हमारा बजाज’ अशी तिच्या जाहिरातीची टॅगलाइन होती. स्कूटरला कंपनीने महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक याचे नाव दिले होते. 34 वर्षे ही स्कूटर देशातील रस्त्यांवर धावत होती. त्यानंतर 2006 मध्ये कंपनीने या स्कूटरची विक्री बंद केली.
कशी असेल नवी चेतक?
जुन्या चेतक स्कूटरमध्ये 145 सीसीचे टू स्ट्रोक इंजिन दिले होते, जे 7.5 बीएचपी पॉवर देत होते. नव्या स्कूटरमध्ये 125 सीसी क्षमतेच्या इंजिनाचा प्रयोग करण्यात येऊ शकतो. त्याशिवाय यामध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअर बॉक्सदेखील समाविष्ट करण्यात येणार आहे. नव्या चेतकमध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट, ब्लू टुथ कनेक्टिव्हिटी आणि कम्बाईंड ब्रेकिंग सिस्टमचा प्रयोग करण्यात येऊ शकतो.





























































